पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘इनोव्हेशन इन आर्किटेक्चर’’ राष्ट्रीय परिषद
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा पुढाकार

पुणे | आर्किटेक्चर क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी येथे आयोजित ‘इनोव्हेशन इन आर्किटेक्चर, टेक्नॉलॉजी अँड अलाईड फील्ड्स’ ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. देशभरातील वास्तुविशारद, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदचे उद्घाटन नामवंत संरक्षक डॉ. बेनी कुरीकोस आणि ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली’चे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. बेनी कुरीकोस यांनी ऐतिहासिक वारसा जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. तर आर्किटेक्ट अभय पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक नीतिमत्ता आणि बदलत्या जागतिकरणानंतर वास्तुविशारदांनी स्वतःला सुसंगत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
हेही वाचा : धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्यस्मृती जागवण्यासाठी ‘बलिदान मास’
राष्ट्रीय परिषदेच्या बक्षिस समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संचालक तेजस सतेज पाटील, कार्यकारी संचालक ऍडमिरल अमित विक्रम (रिटायर्ड) आणि मुख्य वित्त अधिकारी बिपीन शर्मा यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
संशोधन वृत्तीला प्रोत्साहन…
परिषदेच्या दोन दिवसांत पर्यावरणपूरक डिझाइन, आधुनिक एआय चा आर्किटेक्चर क्षेत्रातील वापर, शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर सखोल तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. देशभरातील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले असून उत्कृष्ट प्रकल्पांचा गौरव करण्यात आला. याशिवाय, नामवंत वास्तुविशारदांनी त्यांच्या प्रकल्पांतील अनुभव शेअर केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची मोलाची शिदोरी मिळाली. परिषदेसाठी संयोजक व प्रभारी प्राचार्या आर्किटेक्ट छाया तिरवीर यांनी संपूर्ण सत्रांचे आणि समन्वयाचे यशस्वी नियोजन केले. या परिषदेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चौधरी व आर्किटेक्ट छाया तिरवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषदेने शैक्षणिक व तांत्रिक स्तरावर उच्चांक प्रस्थापित केला आणि संशोधन वृत्तीला प्रोत्साहन दिले.
आर्किटेक्चर फक्त इमारती उभारण्यापुरते मर्यादित नाही; ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत, सर्जनशील आणि सामाजिकदृष्टीने उपयुक्त वातावरण निर्माण करण्याचे माध्यम आहे. या परिषदेत देशभरातील विद्यार्थी आणि विशेषज्ञांनी आपले अनुभव व ज्ञान शेअर केले, ज्यामुळे सर्व उपस्थितांना नवीन दृष्टिकोन मिळाला.
– छाया तिरवीर, प्राचार्या.




