तळेगावात हातोडीने मारून तरुणाचा खून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/murder1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ एका तरुणाचा खून झाला. सुरुवातीला हा खून गोळी झाडून केला असल्याची चर्चा झाली. मात्र शवविच्छेदन केल्यानंतर हा खून कठीण वस्तूने मारून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील दोघांना अटक केली असून त्यांनी हा खून हातोडीने केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दशांत अनिल परदेशी (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत दशांत हा बुधवारी रात्री घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले असता दशांतचा मृतदेह नॅशनल हेवी कंपनीजवळ आढळला. मृतदेह आढळलेले ठिकाण पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दशांतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात दशांतवर गोळी झाडली नसल्याचे तसेच एखाद्या कठीण वस्तूने मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.
दशांतवर कुणी आणि का हल्ला केला याबाबत तळेगाव पोलिसांनी तपास करून दोघांना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी हा मयत दशांतच्या भावकीतीलच आहे. खुन्नस देण्याच्या कारणावरून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. आरोपींनी दशांतवर गोळी झाडली नसून हातोडीचे मागील अनुकुचीदार टोक त्याच्या डोक्यात घुसवले आहे. ज्यामुळे गोळी लागल्या सारखी जखम होऊन दशांतचा मृत्यू झाला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.