एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीवर खुनी हल्ला
पिंपरी l प्रतिनिधी
एका तरुणाने महिलेवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीवर खुनी हल्ला केला. कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी दहा वाजता विद्यानगर चिंचवड येथे घडली.
सागर निवृत्ती बोंद्रे (वय 25, रा. तळवडे, पुणे. मूळ रा. बुलढाणा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष कळसकर (वय 25), आदित्य दीपक तेली (वय 24), रणजीत प्रल्हाद शेडगे (वय 22), एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीला मोरवाडी येथील हॉटेलमध्ये कामावर सोडविण्यासाठी जात होते. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी वेगवेगळ्या दुचाकीवरून जात असताना ते विद्यानगर येथे आले असता आरोपी संतोष याने फिर्यादी यांना अडवले. त्यांना बाजूला नेऊन फिर्यादी यांच्या पत्नीवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर फिर्यादी आरोपीच्या तावडीतून सुटून पळून जात असताना अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.