महापालिका निवडणूक : आरक्षण सोडत ३१ मे रोजी; इच्छुकांचे देव पाण्यात!
![Municipal elections: Leaving reservation on 31st May; God of aspirants in the water!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/अनधिकृत-नळजोडणीवर-कारवाई-करा-पिंपरी-चिंचवड-दर्शन-बस-सेवा-सुरु.jpg)
पिंपरी : आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 31 मे रोजी आरक्षण सोडत होणार आहे. सोडतीनंतर प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत येत्या 31 मे रोजी होणार आहे.
तसेच, १ जून ते ६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचनांचा विचार करून १६ जून रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. महापालिकेचे एकूण ४६ निवडणूक प्रभाग असणार आहेत. या प्रभागामधून १३९ नगरसेवकांना मतदार निवडून देतील. त्यातील ५० टक्के जागांवर महिला नगरसेविका असतील. १३९ पैकी अनुसूचित जातीसाठी २२ (महिलांसाठी ११), अनुसूचित जमातीसाठी तीन (महिलांसाठी दोन), तसेच खुला ११४ (महिलांसाठी ५७) जागा असतील. ४६ पैकी कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, हे पुढच्या मंगळवारी निश्चित केले जाणार आहे.
महापालिका प्रशासन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे.
महापालिका हद्दीत २०११ साली असलेल्या लोकसंख्येचा आधार घेऊन निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आळी आहे. त्यावेळी एकूण १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या होती. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमातीच्या ३६ हजार ५३५ लोकसंख्येचा समावेश आहे. त्यानुसार महापालिकेचे ३९ निवडणूक प्रभाग तयार करण्यात आले असून, तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या एकूण १३९ असणार आहे. त्यातील २२ जागा अनुसूचित जातीसाठी, तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यंदा ओबीसी आरक्षण नसणार आहे. त्यामुळे उर्वरित ११४ जागा खुल्या असतील. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा असतील.
ओबीसी आरक्षण नसल्यामुळे आरक्षण सोडतीच्या दिवशी फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव जागांसाठी सोडत काढण्यात येईल. ज्या प्रभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त असेल, अशा प्रभागापासून सुरूवात करून २२ प्रभागातील १ जागा अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी राखीव तीन जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. महिलांच्या ५० टक्के राखीव जागांसाठी चिठ्ठ्या काढल्या जातील.