महापालिकेच्या सहा शवदाहिन्या टप्प्याटप्प्याने ठेवणार बंद
पिंपरी / महाईन्यूज
कोविड 19 प्रादुर्भावाच्या काळात कोरोनाची बाधा होऊन मृत पावणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील दोन महन्यांपासून शव दाहिनीवर देखील त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काजळी निर्माण झाली आहे. ही काजळी काढून दाहिनीतील फर्नेसचे अंतर्गत देखभालीचे काम करण्यासाठी शहरातील सहा शवदाहिन्या क्रमाक्रमाने दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुने थैमान घातले आहेत. दिवसाला 55 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यातील 30 च्या आतबाहेरची मृतांची संख्या ही शहरातील रहिवाशांची आहे. शवदाहिनीवर ताण वाढला आहे. दररोज शवाचे दहन केले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काजळी निर्माण झाली आहे. फर्नेसचे अंतर्गत देखभालीचे काम करण्याची गरज भासत आहे. एक शवदाहिनी दुरूस्त करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सहा शवदाहिन्यांपैकी एकावेळी एकच शवदहिनी बंद ठेवून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
शवदाहिनी थंड होण्यासाठी किमान तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो. दुरूस्तीचे काम झाल्यानंतर शवदाहिनी कार्यरत करण्यासाठी तिचे तापमान वाढवावे लागते. तापमान वाढवण्यासाठी पुन्हा दोन दिवस दाहिनी चालू ठेवावी लागते. या बाबींचा विचार करून दहा दिवसांचा कालावधी दुरूस्तीसाठी घेण्यात आलेला आहे. एकापाठोपाठ एक अशा सहा दाहिन्या क्रमाक्रमाणे दुरूस्त करण्यात येणार आहेत.
या कालावधीत दाहिनी राहणार बंद
चिंचवड लिंकरोड दाहिनी – फर्नेस क्रमांक 2 ही 21 ते 30 एप्रिल दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. चिंचवड लिंकरोड दाहिनी – फर्नेस क्रमांक 1 ही 1 मे ते 10 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. निगडी विद्युत दाहिनी फर्नेस क्रमांक 1 ही 11 मे ते 20 मे दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. निगडी विद्युत दाहिनी फर्नेस क्रमांक 2 ही 21 ते 30 मे दरम्यान बंद ठण्यात येणार आहे. भोसरी विद्युत दाहिनी 1 ते 10 जून या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. सांगवी गॅस दाहिनी 11 ते 20 जून या कालावधीत बंद राहणार आहे.