breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका देणार अर्थसहाय्य

पिंपरी :  दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान (तीन चाकी ई – वाहन) उपलब्ध करून देण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येणार असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग अशा विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यानुसार दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींना फिरत्या तीन चाकी ई – वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  ही योजना सन २०२४-२५ पासून नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून याद्वारे दिव्यांग बांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे मत प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थीचे मागील किमान ३ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य असावे, लाभार्थीचे नाव समाविष्ट असलेले स्वतःचे किंवा एकत्र कुटुंबाचे रेशनकार्ड, पासपोर्ट, पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील स्वतःच्या  किंवा पालकाच्या नावे असलेली  मालमत्ता कर पावती, स्वतःच्या  किंवा पालकाच्या नावे असलेले विद्युत देयक बिल यापैकी एक पुरावा असणे आवश्यक आहे.  ऑनलाईन अर्ज भरताना लाभार्थीचे मुळ आधारकार्ड तसेच मतदार ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाबाबतचे युडीआयडी कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.  लाभार्थीचा वाहन चालविण्याचा परवाना अपलोड करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे महानगरपालिका कार्यक्षेत्रात हॉकर्स म्हणून व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र किंवा हॉकर्स सर्व्हे मध्ये नोंद असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच दिव्यांग लाभार्थीने संबंधित दुकानदाराकडील ई- वाहनाचे मूळ कोटेशन अपलोड करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी  www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी, शर्ती आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती  महापालिकेच्या  समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button