राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारावा – नाना काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-20-at-11.57.06-AM.jpeg)
पिंपरी / महाईन्यूज
यावर्षी दुसऱ्या लाटेमुळे राज्यात व आपल्या शहरात ऑक्सिजन, औषध आणि बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामध्येच आता कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असताना, तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन आणि कोविड रिलीफ औषधें आणि साहित्य मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले. आपल्या शहरातही ऑक्सीजन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळेे आपल्या पालिकेनेे स्वतःच्या मालकीचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यानी केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोविड- 19 च्या दुस-या लाटेमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण भागातील रूग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णांना साधारण 480 MT दरदिवशी आक्सिजनची गरज लागत होती. सदरील मागणी पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून व इतर जिल्हयातून 350 ते 380 टन ऑक्सिजन मागवावा लागत होता. तर अत्यावश्यक वेळी राज्यातून उर्वरित ऑक्सिजन आयात करून पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी covid-19 च्या येऊ घातलेल्या तिस-या लाटेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.
यामध्ये राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत प्रत्येक जिल्हा, महानगरपालिका यांनी ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण व्हावे अशा सुचना केल्या आहेत. यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा प्राथमिक स्त्रोत नसून त्याऐवजी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वापर करता येईल. LMO प्लांटकडून घेतलेला ऑक्सिजन हा प्राथमिक स्त्रोत असून त्याला सहायभूत म्हणून ऑक्सिजन प्लाट महापालिकेच्या वतीने उभारण्याच्या दृष्टीने विचार करावा. आपल्या शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याची पुढील १० वर्षाची गरज लक्षात घेता सुमारे ५० ते १०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) स्त्रोत खात्रीचा armarked (राखीव) असा निर्माण करणे गरजेचे आहे.
लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( LMO ) प्लांट उभारणी करिता कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत. याकरिता आपल्या महापलिकेसोबत पुणे महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण (जिल्हा परिषद) यांना सोबत घेऊन हा प्रकल्प उभारता येईल का ? याची संबंधित अधिकार्यांशी चर्चा करावी. जर चर्चेतून ऑक्सिजन प्लांट उभारणी करिता तत्वतः मान्यता दिल्यास सदरचा प्लांट उभारणीकरिता राज्य शासन व प्रशासकीय स्तरावर सर्व परवानगी घेवून हा प्रकल्प तिसरी लाट येण्यापूर्वी 4 ते 5 महिन्यांमध्ये पूर्ण करता येईल का? यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी काटे यांनी केली आहे.