महापालिका आयुक्तांनी करुन दाखवले : ‘स्पर्श’चे डॉ. प्रवीण जाधव यांच्यासह दोघांना अटक
![Municipal Commissioner did it: Dr. Praveen Jadhav and two others were arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/doctor.jpg)
-
मोफत सुविधा असताना बेडसाठी १ लाख रुपये घतले
-
पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी वादग्रस्त आणि खंडणीखोर ‘स्पर्श’ या संस्थेचे डॉ. प्रवीण जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच, पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला असून, अटकही करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तरीदेखील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन डॉक्टरांना अटक केली आहे.
स्पर्श प्रा. लि. चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (वय 55, रा. चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून एक लाख रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली. सुरेखा यांच्या नातेवाईकांकडून आरोपी डॉ. प्रवीण जाधव याने एक लाख रुपये घेतले. त्यातील कट प्रॅक्टीस म्हणून वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहायक निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.
***
भाजपाच्या नगरसेवकांचे शहरात कौतूक…
भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी उघडकीस आणले होते. तर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावरून बराच गदारोळ झाला होता. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करावी, असा तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. भाजपाच्या नगरसेवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शहरात गायकवाड आणि डोळस यांचे शहरात कौतूक होत आहे.