मिशन PCMC : प्रभाग रचनेच्या लढाईत खासदार बारणे- आमदार लांडगे यांचा ‘‘शतप्रतिशत कंट्रोल’’
राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या टप्प्यातच कोंडी : एकूण सहा प्रभागांमध्ये प्रस्थापित उमेदवार ‘‘डॅमेज’’

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
महापालिका निवडणुकीती विजयाच्या दिशेने घोडदौर करण्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रभाग रचनेवरील पकड मजबूत करणे. या टप्प्यात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी बाजी मारली. बारणेंनी विशेष लक्ष घातले आणि आपला मुलगा विश्वजित बारणे यांचा मार्ग सोपा केला. त्याचा परिणाम अन्य तीन प्रभागांवर झाला. तर, आमदार लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीत ‘‘फूसफूस’’ करण्याऱ्यांची नांगी ठेचली आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 साठीची प्रभाग रचना भाजपा आणि शिवसेना शिंदे गटास अनुकूल झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिकूल झाली आहे, असा दावा केला जातो.
खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे गटास आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटास शह दिला. प्रभाग रचनेमध्ये दोन प्रभाग आमदार लांडगे यांच्या भागातील आणि एक प्रभाग खासदार बारणे यांच्या भागातील आहे.
खासदार बारणे यांचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या पदमजी पेपर मिल, गणेशनगर प्रभाग २४ मध्ये मागीलवेळी चारपैकी एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होती. यातून शिवसेनेचे सचिन भोसले निवडून आले होते. पुढे ते ठाकरे गटाचे शहराध्यक्ष झाले. आता यातील म्हातोबा वस्ती हा परिसर प्रभाग २५ वाकडला जोडला आहे. त्यामुळे या प्रभागातील अनुसूचित जातीची मतदारसंख्या कमी होणार आहे. परिणामी या गटाचे आरक्षण राहणार नाही. त्यामुळे भोसले यांना उभे राहण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा : “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केलं”; सर्वोच्च न्यायालयात बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य
तसेच, गेल्यावेळी २४ मधून बारणे यांचे पुतणे नीलेश बारणे निवडून आले होते. यावेळी मुलगा विश्वजित इच्छुक आहे. त्यामुळे मुलगा आणि पुतण्या या दोघांना सुरक्षित करण्यासाठी बारणे यांनी यातील परिसर प्रभाग २५ ला जोडला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीला संधी नाही आणि महाविकास आघाडीच्या पॅनेलवरसुद्धा परिणाम होणार आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने प्रभाग रचनेत अपेक्षीत असलेले बदल करण्याबाबत मोठी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, खासदार बारणे आणि आमदार लांडगे यांनी प्रभाग रचनेवर ‘‘शतप्रतिशत कंट्रोल’’ ठेवला. निवडणुकीच्या वातावरण निर्मितीमध्ये या निमित्ताने भाजपा-सेना आघाडीवर आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का…
शहरातील एकूण ३२ प्रभागांमधील केवळ ३ ठिकाणी बदल झाला आहे. प्रभाग क्रमांक १, ६ आणि २४ असे बदल झालेले प्रभाग असून, त्याचा परिणाम प्रभाग २९, २५, ३, १२ मध्ये होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत पूर्वी तळवडे प्रभागात असलेला ताम्हाणे वस्ती हा भाग चिखलीला जोडलेला आहे. 2017 मध्ये तळवडेतून राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडून आले होते. त्यांचे पॅनेल आता ‘‘डिस्टर्ब’’ झाले आहे. प्रभाग सहामधील गावजत्रा मैदान आणि महापालिका हॉस्पिटल हा भाग भोसरी गावठाणात जोडला आहे. या प्रभागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटासाठी संधी निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्याकडे या प्रभागातून सर्वसाधारण गटातील तगडे उमेदवार आहेत. प्रभाग 6 चा एसटी आरक्षण प्रभाग 29 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पॅनेलवर परिणाम होणार आहे.




