निगडीत लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी मनसेचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/nigdi-mnse.jpg)
– लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून मनसे आक्रमक
पिंपरी l प्रतिनिधी
निगडी चौकातील लोकमान्य टिळक यांचा अर्धाकृती पुतळा आहे त्याच जागी पूर्णाकृतीत बसवावा. तसेच परिसर सुशोभित करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेने आज (मंगळवारी, दि. 18) आंदोलन केले. मागणीचे निवेदन क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, मुख्य कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांना देण्यात आले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, उपाध्यक्ष बाळा दानवले, मनविसे अध्यक्ष हेमंत डांगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ वैद्य, संघटक के के कांबळे, महिला प्राधिकरण विचार मंच निगडी प्राधिकरणच्या अध्यक्षा स्वाती दानवले, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, आशिष चव्हाण, भागवत नागपुरे, शंतनु चौधरी, प्रसाद मराठे, गणेश काळभोर, रोहित शिंदे, धनंजय देशमुख, नाना काळभोर, रोहन कांबळे आदी उपस्थित होते.
निगडी मधील मुख्य चौकातील सिग्नल जवळ एक ऑगस्ट 1988 रोजी लोकमान्य टिळक यांचा अर्धा पुतळा बसविण्यात आला आहे. तेव्हा पासून निगडी प्राधिकरण मधील लोकांना या पुतळ्याविषयी आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. निगडी प्राधिकरणाची मुख्य ओळख या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यामुळे होत आहे. शहरात पालिका स्थापन झाल्यानंतर हा शहरातील पहिला पुतळा आहे. शहरात अनेक विकासकामे झाली. मोठे पुतळे झाले पण या भागातील स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
हा अर्धाकृती पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारावा. तसेच परिसर सुशोभित करावा, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.