आमदार महेश लांडगे म्हणतात… तिकीट-पद-विकासकामांच्या निर्णयासाठी पिंपरी-चिंचवडकर ‘आत्मनिर्भर’
![आमदार महेश लांडगे म्हणतात… तिकीट-पद-विकासकामांच्या निर्णयासाठी पिंपरी-चिंचवडकर ‘आत्मनिर्भर’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/md-1.jpg)
- समाविष्ट गावात गेल्या २० वर्षांमध्ये सर्वाधिक पदे आणि विकासकामे केल्याचा दावा
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पद आणि तिकीट वाटपाच्या निर्णयासाठी आता पिंपरी-चिंचवडकर ‘आत्मनिर्भर’ आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात कोणत्याही नगरसेवकाला पद मिळवण्यासाठी शहराबाहेरील नेत्यांचे उंबरे झिजवावे लागले नाही. शहराच्या विकासाबाबतचे निर्णय शहरात घेण्याला प्राधान्य आणि स्वांतत्र्य भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिले, असा दावा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केला.
फ- प्रभाग समितीचे अध्यक्ष कुंदन गायकवाड यांच्या पुढाकाराने चिखली येथे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर, माजी महापौर राहुल जाधव, भाजपाचे पदाधिकारी- नगरसेवक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, टाळगाव चिखली गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत गावांचा समावेश होवून सुमारे २० वर्षे झाली. मात्र, २०१७ पूर्वी आणि नंतर असा या गावाचा आणि उपनगरांचा झालेला विकास आणि केलेला खर्च यातील तफावत मोठी आहे. २० वर्षे या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागला. पण, भाजपा काळात या समाविष्ट गावातील विकासाला चालना मिळाली.
- पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे ‘मिनी भारत’…
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी, कामगार नगरी आहे. या शहरात नोकरी-व्यावसायानिमित्त देशातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील माणूस काम करीत करीत आहे. वास्तव्य करीत आहे. शहराचा विकास होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे योगदान आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसारच भाजपाचा प्रत्येक नगरसेवक महापालिकेत काम करीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
- समाविष्ट गावातील नगरसेवकांना भाजपाने ताकद दिली…
समाविष्ट गावांतील विकासासाठी किंवा एखाद्या पदासाठी येथील नगरसेवकांना शहराबाहेर जावे लागले नाही. येथील नगरसेवकांनी स्वत: निर्णय घेतले आणि विकासकामे मार्गी लावले. प्रत्येकाला लहान-मोठी पदे मिळाली. चिखली परिसरात राहुल जाधव यांच्या रुपाने महापौरपद मिळाले. स्थायी समिती, क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती अशा विविध समित्यांवर समाविष्ट गावांतील नगरसेवकांनी कामे केली आहेत. त्यामुळे प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची कामे पोहोचली, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
- जो काम करेल, त्याच्यावरच विश्वास ठेवा…
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना सूचक आवाहन केले आहे. ‘‘आपला विश्वास अशा व्यक्तींवर ठेवा. जो आपले काम करेल. आपल्या अडचणीत उभा राहील. कोणी खूप सुंदर दिसतो म्हणून मतदान करु नका किंवा कोणी आपल्या नात्यातला आहे म्हणून मतदान करु नका. जो विकासाची कामे मार्गी लावण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची धमक ठेवतो. त्याच व्यक्तीला मतदान करा,’’ असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. तसेच, जो काम करणार नसेल, तर तो नातेवाईक काय कामाचा? तो एखाद्या समाजाचा नेता काय कामाचा? असा सवालही आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांसमोर ठेवला आहे.
- शहराचे निर्णय शहरात होतात…
भाजपामध्ये शहरातील निर्णय शहरात घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि मी तिकीट वापट आणि पद वाटपामध्ये सामोपचाराने निर्णय घेत असतो. त्यामुळे आम्हाला शहराचे निर्णय घेण्यासाठी शहराबाहेर जावे लागत नाही, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.