पिंपरी विधानसभा क्षेत्रात विविध प्रभागात आमदार अमित गोरखे यांच्या बैठका

पिंपरी | विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारावर महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे विशेष लक्ष असून प्रत्येक प्रभागातील राजकीय घडामोडींवर ते बारकाईने नजर ठेवून आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळख असलेले आमदार अमित गोरखे हे विधानपरिषद सदस्य असले तरी पिंपरी विधानसभा क्षेत्रात त्यांचे सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व पाहायला मिळत आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील उमेदवारांसोबत सातत्याने चर्चा, नियोजनात्मक बैठकांचे आयोजन तसेच प्रत्यक्ष प्रचारातही आमदार गोरखे स्वतः सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : महाळुंगे व चाकण वाहतूक विभागाला १०० बॅरेकेट्सची भेट!
मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता रुग्णालय परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सौ. मोनिका सुरेश निकाळजे (यांचे पती श्री. सुरेश निकाळजे), श्री. गणेश रामराव ढाकणे, सौ. उषा संजोग वाघेरे, श्री. नानिक उर्फ नरेश रामचंद्र पंजाबी या चारही भाजप उमेदवारांसह राजू दुर्गे तसेच राजेश पिल्ले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान आमदार अमित गोरखे यांनी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, सुरू असलेला प्रचार, नागरिकांच्या समस्या तसेच उमेदवारांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली. या अडचणींवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
चारही उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी सुस्पष्ट नियोजन आणि रणनीती आखण्यात आली. या बैठकीस उमेदवारांसोबतच त्यांचे प्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.




