मिशन PCMC: महापालिका निवडणुकीसाठी सोसायटी फेडरशेनचाही ‘‘जाहीरनामा’’
फेडरेशनतर्फे ‘विचार मंथन’ : शहरातील सोसायटीधारकांची भूमिका ठरणार निर्णायक

पिंपरी-चिंचवड : आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील सोसायटीधारकांची भूमिका अधिक ठोस करण्यासाठी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे विशेष ‘विचार मंथन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ही महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ऐश्वर्यम बँक्वेट हॉल, बिकानेर स्वीटमार्ट शेजारी, गोल्ड जिम समोर, फेडरेशन ऑफिस समोर, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे पार पडणार आहे, अशी माहिती चिखली- मोशी- चऱ्होली – पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.
शहरातील एकूण मतदानापैकी तब्बल ९० टक्के मतदान सोसायटीधारकांचे असून, या बहुसंख्य मतदारांचा आवाज एकत्र करून, त्यांच्या अपेक्षा, मागण्या आणि दृष्टिकोन या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीची योग्यता, पात्रता, शिक्षण, तसेच त्याच्याकडून असणाऱ्या सोसायटीधारकांच्या अपेक्षांवर सखोल चर्चा होणार आहे. शहरातील नागरी समस्यांपासून ते सोसायटीच्या मूलभूत प्रश्नांपर्यंत सर्व मुद्द्यांचा या चर्चेत विचार केला जाईल.
हेही वाचा – निगडीत मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली PMPML च्या इलेक्ट्रिक बसला आग, सर्व प्रवासी सुखरूप
जाहीरनामा संकल्पनेची घोषणा
फेडरेशनतर्फे या बैठकीतून एक संयुक्त निवडणूक जाहीरनामा तयार केला जाणार असून, तो सर्व राजकीय पक्षांसमोर सादर केला जाईल. हा जाहीरनामा केवळ मागण्या मांडणारा नसून, तो एक दिशादर्शक दस्तावेज ठरणार आहे, जो लोकप्रतिनिधींनी काम करताना मार्गदर्शक म्हणून वापरावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीनंतर, फेडरेशनमार्फत शहरातील सर्व सोसायट्यांमध्ये संवाद दौरा राबविण्यात येणार असून, प्रत्येक सोसायटीधारकाचे मत जाणून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.हा दौरा म्हणजे केवळ संवादच नव्हे, तर शहर विकासासाठी नागरिक सहभागाचे एक सक्षम माध्यम ठरेल.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी-चिंचवड शहराच्या एकूण मतदानापैकी सोसायटीधारकांचे 90 टक्के मतदान आहे. त्यामुळे मतदानामध्ये बहुसंख्य असणाऱ्या मतदारांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत? स्थानिक लोकप्रतिनिधीची काय योग्यता पात्रता असावी? याबद्दल चर्चा विनिमय करून सोसायटीधारकांच्या अपेक्षांचा जाहीरनामा सर्व पक्षांसाठी जाहीर केला जाणार आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी- चऱ्होली – पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.




