breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘विधानसभेच्या २५ जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी’; ॲड. मनोज आखरे

पिंपरी | लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकमशाही अशी होती. या निवडणुकित संभाजी ब्रिगेडने अपेक्षेशिवाय काम केले. परंतु महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत किमान पंचवीस जागा संभाजी ब्रिगेड मागणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडने राज्यात सर्व जागांवर महाविकास आघाडी बरोबर प्रचार व प्रसार केला त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला किमान ३५ जागांवर विजय मिळेल. राज्य सरकार निष्क्रिय असून केंद्र सरकारच राज्य सरकार चालवीत आहे. पुणे औद्योगिक परिसरासह राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत हे भाजपा व आरएसएस चे षडयंत्र आहे. यातून राज्यातील बेरोजगारीत वाढ होणार आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यात जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री व पालकमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी ही मागणी ॲड. आखरे यांनी केली.

संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारणीची बैठक गुरुवारी (दि. ३०) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे बोलत होते. यावेळी प्रदेश सहसंघटक मनोज गायकवाड, संघटन सचिव डॉ. संदीप कडलग, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आदींसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा    –      तीन दिवसांच्या चढाईनंतर नरमले सोने-चांदी! जाणून घ्या आजचे दर

ॲड. आखरे यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा बरोबर युती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे, विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील सोबत लढणार आहोत. विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड या पक्षाला २५ जागा मिळाव्यात यामध्ये हिंगोली व चिखली या जागा फिक्स केल्या आहेत, तर इतर जागांबाबत लवकरच निर्णय होईल. शिलाई मशीन हे आमचे चिन्ह असून विधानसभा निवडणुकीत चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ.

आरोग्य, शिक्षण व बेरोजगारी, शेतकरी, महिला या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ ३ जून पासून सर्व जिल्ह्यांमध्ये संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गाव खेड्यातील गरिबांचे शिक्षण बंद होणार आहे. शिक्षण व्यवस्था निधर्मी असली पाहिजे, यामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे. सीबीएससी च्या पॅटर्नमध्ये आतापर्यंत शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांचा समावेश का केला नाही? याचे प्रथम सरकारने उत्तर द्यावे. आरोग्याच्या खाजगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. भाजपा हे आरएसएसचा अजेंडा राबवित आहे. त्यांनी देश विकायला काढला आहे. देशाची संपत्ती अदानी, अंबानी सारख्या भांडवलदारांच्या माध्यमातून आरएसएस आणि भाजप ताब्यात घेत आहे हे षडयंत्र आहे असेही ॲड. आखरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button