कुदळवाडीमध्ये महापालिका शाळेच्या नवीन इमारतीत गैरप्रकार सुरू; सुरक्षारक्षक नेमण्याची दिनेश यादव यांची मागणी
![Malpractice continues in the new building of the Municipal School in Kudalwadi; Dinesh Yadav demands appointment of security guards](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/IMG-20210419-WA0012.jpg)
पिंपरी |
कुदळवाडीच्या प्रभाग ११ च्या शाळा क्रमांक ८९ साठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा गैरवापर होत असून त्याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने त्वरित सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन शाळा बांधली असून,लॉकडाऊन मुळे ऑफलाईन शिक्षण बंद असल्याने सर्व शाळा बंद आहेत.कोऱ्या करकरीत इमारतीला बघून अनेक मद्यपी, तळीराम, पत्ते खेळणारे अशा अनेक लोकांकडून इमारतीचा गैरवापर करण्यात येत आहे.
प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमला नसल्याने अशा लोकांचे फावत असून, आपल्या मालकीची इमारत असल्यागत त्याचा राजरोसपणे वापर चालू आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित सुरक्षारक्षक नेमून अशा प्रकारांना आवर घालावा अशी मागणी यादव यांनी केली आहे. या प्रकारांमुळे आसपासच्या नागरिकांनाही मनःस्ताप सहन करण्याची नामुष्की येत असून, इमारतीचे नुकसानही करण्यात येत आहे असे यादव यांनी म्हटले आहे. पुढील काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी लवकरात लवकरच सुरक्षा विभागाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे असे दिनेश यादव यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके, फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड उपस्थित होते.
वाचा- मौजमजेसाठी सुशिक्षित तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी; तिघांना अटक