मोशीकरांचा निर्धार, महेश लांडगे यांना करणार तिसऱ्यांदा आमदार!
महायुतीच्या आपुलकीच्या गाठी-भेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
![Mahesh Landge will be the MLA for the third time to decide for Moshikar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Mahesh-Landge-1-780x470.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या मोशीतील प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. समाविष्ट गावांच्या विकासासाठी ज्याने पुढाकार घेतला. त्या महेश लांडगे यांना आम्ही साथ देणार, असा निर्धार यावेळी मोशीकरांनी केला.
भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या टप्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. रविवारी सुट्टीचे निमित्त साधत समाविष्ट गावात प्रचार केला. मोशी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – चिंचवडमधून नाना काटे यांची तलवार म्यान, महायुतीचे पारडे जड!
दरम्यान, बोराटेवस्ती येथे निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हजारे वस्ती, वाघजाई मित्र मंडळ, बनकर वस्ती, टेकाळे, आल्हाट, खिराडी, पुणे-नाशिक हायवे, गणेशनगर, स्वामी समर्थ कॉलनी 1, 2, 3, गायकवाड वस्ती, भारतमाता चौक, नागेश्वर नगर 1, 2, 3 या परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, मोशी, ग्रामस्थ, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, समाविष्ट गावातील नागरिकांना मला राजकारणात संकटात असताना साथ दिली. माझ्या संघर्षाच्या काळात या भागातील नागरिक ठामपणे पाठीशी उभे राहिले. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरिकांना मी विसरू शकत नाही. समाविष्ट गावातील नागरिकांची उतराई होण्यासाठी या भागात विकासाची गंगा आणली आहे. या भागाचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न आहे. २०१७ पासून समाविष्ट गावात सर्वात मोठी विकास कामे केली आहेत. या भागासाठी सर्वाधिक आमदार निधी दिला आहे. यापुढेही समाविष्ट भागातील विकास कामे करण्यात कमी पडणार नाही.
१९९७ पासून समाविष्ट गावांकडे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या बाबतीत आणि राजकीय प्रतिनिधीत्व देण्यास दुर्लक्ष केले. भाजपा सत्ताकाळात २०१७ नंतर या गावांच्या विकासाला चालना मिळाली आणि दोन महापौर आणि विविध समितीच्या सभापतीपदाची संधी देता आली. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षम झाल्या. वेस्ट टू एनर्जी, संतपीठ, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, आयआयएम कॅम्पस, मोशी हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शाखा समाविष्ट गावांमध्ये होत आहे, ही बाब निश्चितच आश्वासक आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.