मावळात महाविकासआघाडी स्वतंत्र लढणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Suhas-Diwase-23-780x470.jpg)
पिंपरी : विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा राज्यात महाविकासआघाडी आणि महायुती अशा प्रमुख दोन आघाड्यात विधानसभेची लढत होइल असे साधारण चित्र आहे.मावळातही मविआ आणि महायुती या दोन्ही आघाड्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. दोन्ही बाजूने अनेक इच्छुक उमेदवार समोर आले आहेत.
परंतु मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांबाबत खुलासा करण्यासाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे प्रतिनिधींनी जाहीर केले.
मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडी अपक्ष आमदाराला पाठींबा देइल, आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही, अशा प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. तसेच राजकीय वर्तूळातही अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती आणि अद्यापही आहे.
हेही वाचा – काही ठिकाणी लढणार, काही ठिकाणी पाडणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
या सर्व गोष्टींवर महाविकासआघाडीकडून कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर या चर्चांचा जोर वाढू लागल्याने आणि पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढल्याने शनिवारी काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तिनही पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी एकत्र येत मविआची भुमिका स्पष्ट केली.
मावळ मतदारसंघात महाविकासआघाडीच्या वतीने उमेदवार दिला जाणार आहे. परंतु सध्या तालुक्यात एक संभ्रम पसरविला जातोय की, सर्वपक्षीय उमेदवार ठरविला आहे आणि महाविकासआघाडीचा त्याला पाठींबा आहे. पण असं काहीही नाही. सर्वपक्षीय अपक्षाला पाठींबा असा कोणताही निर्णय वरच्या पातळीवर झालेला नाही.
त्यामुळे हा संभ्रम कुणीही निर्माण करू नये. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही भूमिका स्पष्ट करू नये. येत्या काही दिवसात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो निर्णय आपण सर्वांनी मान्य करायचा आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ यांनी सांगितले.
महाविकासआघाडीत तीन घटक पक्ष आहेत. या घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आघाडीतील वरिष्ठ जो आदेश देतील, तो आदेश पाळायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो आम्ही पाळणार आहेत.परंतु कार्यकर्त्यांनी कोणत्याही संभ्रमाला बळी पडू नये. कुठलाही प्रकारचा शब्द कुणालाही देऊ नये. लवकरच महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होइल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे यांनी सांगितले.
मावळ विधानसभेत महाविकासआघाडीची ताकद खुप मोठी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आघाडीची ताकद दिसून आली. आताही तिन्ही पक्ष मिळून विधानसभेला सामोरे जावू.परंतु सध्या महाविकासआघाडी बाबत जो संभ्रम निर्माण केला जातोय, त्या संभ्रमाला कोणत्याही कार्यकर्त्याने बळी पडू नका आणि आघाडीची ताकद कमी करू नका, असे काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले.
जर निवडून येणारा नेता असेल आणि तो महाविकासआघाडीत येत असेल, तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांनी त्या उमेदवाराला तिकीट द्यायचं जाहीर केलं, तर आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहोत. त्यामुळे पक्षाचा आदेश आम्ही पाळणार. विधानसभा जिंकण्यासाठी जर असा काही निर्णय आयात उमेदवाराबाबत पक्षाने किंवा वरीष्ठांनी घेतला, तरीही आम्हाला तो मान्य असेल, असे दत्तात्रेय पडवळ यांनी सांगितले.