लोकसंवाद : ‘‘विठोबा ते विराज’’ भोसरीतील लांडे कुटुंबियांचा राजकीय वारसा अन् समाजसेवेचा वसा !
![Lok Samvad: "Vithoba to Viraj" Political legacy of Lande family in Bhosari and fat of social service!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/virajlande-pcmc.jpg)
- युवा नेते विराज लांडे आता महापालिका निवडणुकीच्या मैदानात
- वाढदिवसानिमित्त भोसरी गावठाण परिसरात तुफान ‘ब्रँडिंग’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर लांडे कुटंबियांचे योगदान लक्षवेधी आहे. शहराचे राजकीय वर्तुळ तर लांडे कुटुंबियांशिवाय पूर्ण होवूच शकत नाही. माजी नगरसेवक कै. विठोबा लांडे यांच्यापासून सुरू झालेला राजकीय आणि अन् समाजसेवेचा वारसा व वसा आता युवा नेते विराज लांडे चालवणार आहेत.
विराज लांडे यांचा वाढदिवस नुकताच (५ जानेवारी) साजरा करण्यात आला. कोविड परिस्थितीमुळे कोणताही दिखावा न करता साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला असला तरी, सोशल मीडियासह भोसरीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये चांगलेच बँडिंग करण्यात आले आहे.
महापालिका प्रभाग क्रमांक ७ म्हणजेच शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅंडविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर अर्थात भोसरी गावठाण आणि परिसर हा लांडे कुटुंबियांचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘होम पिच’राहीले आहे. याच भागातून आगामी महापालिका निवडणुकीत विराज लांडे राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करतील, अशी शक्यता आहे.
या परिसरातून सध्या भाजपा नगरसेवक संतोष लोंढे, प्रा. सोनाली गव्हाणे, भिमाबाई फुगे आणि स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन लांडगे प्रतिनिधीत्व करीत आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी लांडे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीकडून नव्या दमाचा चेहरा मैदानात उतरवला जाईल, अशी चर्चा आहे.
माजी आमदार विलास लांडे यांचे वडील स्व. विठोबा लांडे नगरपालिका असताना नगरसेवक होते. महापालिका स्थापन झाल्यानंतर १९९२ मध्ये विलास लांडे नगरसेवक झाले. त्यानंतर विलास लांडे पिंपरी-चिंचवडचे महापौरही झाले. १९९७ मध्ये मोहिनी विलास लांडे यांनी राजकारणात ‘एन्ट्री’ केली. २००७ आणि २०१२ मध्ये मोहिनी लांडे निवडून आल्या. पिंपरी-चिंचवडचे महापौर महिला राखीव झाल्यानंतर मोहिनी लांडे महापौर झाल्या. २०१२ मध्येच विलास लांडे यांचे बंधू विश्वनाथ लांडे नगरसेवक झाले. २०१७ म्हणजे पाच वर्षांपूर्वी भाजपाचे वातावरण असतानाही विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे यांनी मैदान मारले. प्रभाग क्रमांक ८ मधून विक्रांत आता प्रतिनिधीत्व करीत आहेत. लांडे कुटुंबियांनी आता आणखी एक ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला आहे. माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे यांचा मुलगा युवा उद्योजक विराज लांडे आगामी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भोसरीतील दोन ते तीन प्रभागात भाजपासमोर लांडे कुटुंबियांचे तगडे आव्हान राहणार आहे.
राष्ट्रवादीकडून आता नवोदितांना संधी…
माजी नगरसेवक स्व. विठाबा लांडे पिंपरी-चिंचवडमध्ये सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. वारकरी सांप्रदायाचे संस्कार असलेल्या लांडे कुटुंबियांची नवी पिढी असलेल्या विक्रांत लांडे यांच्या कार्यशैलीवर आजपर्यंत एकही आरोप झालेला नाही. आता विक्रांत यांच्या साथीने विराज आपला समाजसेवेवा वारसा घेवून राजकीय मैदान गाजवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिमा आयुष्यभर देव्हाऱ्यात ठेवून पूजा करणारे स्व. विठोबा लांडे यांच्या समाजसेवेचा वेलू पेलण्याची जबाबदारी विराज यांच्या खांद्यावर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणानुसार आता नवोदितांना संधी देण्याबाबत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी सुतोवाच केले आहे. त्यामुळे भोसरीतील राजकारणात आता ‘‘विराज ब्रिगेड’’लढणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.