#Lockdown : दत्ताकाकांच्या रुपाने चिखलीत अवतरला अन्नदाता, प्रभागातील हजारो नागरिकांची घेतली जबाबदारी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना धान्य वाटप केले जात आहे. मागील 15 दिवसांपासून रेशनकार्ड नसलेल्या चिखली परिसरातील नागरिकांना दररोज गहू आणि तांदळाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी 700 पोती गहू आणि तांदूळ विकत आणल्याचे दत्ताकाकांनी सांगितले. एकही नागरिक भुकेला राहू नये, यासाठी यापुढेही धान्य वाटप सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात 25 मार्चपासून लॉकडाउन आहे. त्याचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाउन असल्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे हातावर पोट असणा-या नागरिकांचे मोठे हाल होत आहे. शहरात राज्याच्या विविध भागातील नागरीक उपजिवीकेसाठी आले आहेत. अनेकांकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना धान्य देखील मिळत नव्हते. त्यामुळे दत्ताकाका साने स्पोटर्स फाऊंडेशनतर्फे नागरिकांना धान्य वाटप केले जात आहे.
नगरसेवक दत्ता साने म्हणाले, चिखली परिसरात गोरगरीब नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. राज्याच्या विविध भागातील नागरिक या परिसरात असून मोलमजुरी करुन आपली उपजिवीका भागवितात. त्यांचे हातावरचे पोट आहे. लॉकडाउनमुळे कामधंदे बंद असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहे. अनेकांकडे रेशनकार्डही नाही. त्यामुळे मागील 15 ते 20 दिवसांपासून परिसरातील नागरिकांना दररोज धान्याचे वाटप केले जात आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, हाताला रोजगार नाही. अशा हजारो नागरिकांना धान्य वाटप केले आहे. त्यासाठी 700 पोती गहू आणि 700 पोती तांदूळ विकत आणला आहे. कोणीही भुकेला राहू नये यासाठी धान्य वाटप केले जात आहे. यापुढे धान्य वाटप करणार असल्याचे काकांनी सांगितले.