breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार आण्णांचे एकला चालो रे ; पिंपरीत राष्ट्रवादीचा ‘खेला होबे रे’

राजकीय चर्चेला उधाण : अजित पवार ‘लक्ष’ घालणार काय?

पिंपरी : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘खेला होबे रे’ ही प्रचार घोषणा प्रचंड गाजली. भाजपासोबत झालेल्या अटितटीच्या लढतीत एकाकी ममतांनी बाजी मारली. अशीच काहीशी परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये २०२४ मध्ये पहायला मिळण्याची शक्यता आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अण्णा बनसोडे सध्यस्थितीला राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे चित्र आहे. स्थानिक पदाधिकारी आणि नेते कोणत्याही निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाहीत आणि पक्षश्रेष्ठी किंबहुना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ‘कारभारी’ अजित पवारसुद्धा दखल घेत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित असलेले आमदार बनसोडे वैयक्तिक पातळीवर बैठका- चर्चा आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहरातील एकमेव आमदार आणि अजित पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी आमदार अण्णा बनसोडेंची ओळख आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात बनसोडे राजकीयदृष्टया ‘कॉर्नर’ झाले. स्थानिक पातळीवर संघटनात्मक बदल झाले. त्यानंतर बनसोडेंसह काही दिग्गज नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळे राष्ट्रवादीत नवे-जुने किंवा लांडे गट, वाघेरे गट, बहल गट, गव्हाणे गट, शिलवंत गट, मिसाळ गट, भोईर गट, काटे गट, कलाटे गट अशी अप्रत्यक्षपणे शकले पडली आहेत.
दरम्यान, गटातटांत विखुरलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याओंजळीने पाणी पिण्यापेक्षा ‘‘आपला मतदार संघ भला आणि मी भला’’ अशा भूमिकेत अण्णा बनसोडे दिसतात.
**
…तर राष्ट्रवादीचे पानिपत निश्चित
वास्तविक, आमदार बनसोडे यांची नाराजी राष्ट्रवादीला परवडणारी नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघातून सुमारे १४ ते १६ नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीचा ‘परफॉर्मन्स’ हा या मतदार संघात केवळ बनसोडेंच्या भूमिकेवर अवलंबून आहे. बनसोडे यांनी बोटचेपी भूमिका घेतल्यास किंवा भाजपात प्रवेश केल्यास केवळ राष्ट्रवादीला फटका बसणार असून, भाजपाला फायदा होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाकी लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांना सहज घेण्याची चूक भाजपाला भोवली, तशी राष्ट्रवादीत एकाकी पडलेल्या अण्णा बनसोडेंना हलक्यात घेणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी ‘कारभारी’ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार जातीने लक्ष घालतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
**
अजित पवार, जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला दांडी…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघातच आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे हे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे नाराज दिसत आहेत. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती बोचणारी असतानाही वरिष्ठ नेत्यांकडून मात्र समजूत काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरात गेल्या १५ दिवसांत दोन कार्यक्रम झाले. या दोन्ही कार्यक्रमांना आमदार बनसोडे यांनी ‘दांडी’ मारली. मात्र, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि नुकतेच महावितरण अधिकाऱ्यांशी वीज समस्येबाबत तत्परते आमदार बनसोडे यांनी बैठक घेतली. त्यामुळे आमदार बनसोडेंच्या मनात चाललेय तरी काय? अशी सवाल उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button