चिंचवडमधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या आरक्षण सोडत; निवडणूक विभागाकडून कार्यक्रमाची तयारी पूर्ण
![चिंचवडमधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या आरक्षण सोडत; निवडणूक विभागाकडून कार्यक्रमाची तयारी पूर्ण](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/चिंचवडमधील-प्रारामकृष्ण-मोरे-प्रेक्षागृहात-उद्या-आरक्षण-सोडत-निवडणूक-विभागाकडून-कार्यक्रमाची.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण खुला गटातील (ओपन) जागेसाठी महिला आरक्षण सोडत उद्या (मंगळवार दि.३१) सकाळी ११ वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. त्याची संपूर्ण तयारी पालिकेच्या निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. त्यासंदर्भात ट्रायलही घेण्यात आली आहे.
अंतिम त्रिसदस्यीय ४६ प्रभाग प्रभागरचना १३ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आता आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे. पारदर्शक काचेच्या डॅममध्ये एका रंगाच्या चिठ्ठया टाकून विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढली जाणार आहे. नागरिकांना सोडत व्यवस्थित दिसावी म्हणून प्रेक्षागृहात व बाहेर स्क्रिन लावण्यात येणार आहे. संपूर्ण सोडतीचे छायाचित्रिकरण केले जाणार आहे. गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तासह पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. सोडतीसंदर्भात इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सोडतीनंतर १ ते ६ जून असे सहा दिवस सोडतीसंदर्भात हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. हरकत व सुचनांचा विचार करून १३ जूनला प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून प्रसिद्ध केले जाईल.
अशी होणार प्रक्रिया
प्रथम एससीच्या एकूण २२ जागांपैकी महिलांसाठी ११ जागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर एसटीच्या एकूण ३ जागांपैकी महिलांच्या २ जागांची सोडत निघेल. एससी व एसटीच्या एकूण २५ जागांच्या चिठ्ठया बाजूला ठेवल्या जातील. उर्वरित ११४ जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या ५७ जागांची चिठ्ठी काढली जाईल. त्यासाठी प्रथम प्रभागातील ‘अ’ जागेवरील चिठ्ठया काढल्या जातील. त्यानंतर ‘ब’ जागेवरील चिठ्ठया निघतील. उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील. एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत. एक प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिलांचे आरक्षण असणार नाही.
महिलांच्या ७० चिठ्या काढणार
एससीच्या २२ पैकी ११ जागा महिलांचा आहेत. तर, एसटीच्या ३ पैकी २ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण खुल्या गटासाठी एकूण ११४ जागा असून, त्यातील ५७ जागा महिलांकरीता आहेत. एकूण १३९ जागेतून महिला जागेसाठी ७० चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.