breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पक्षादेश धुडकावून गटनेत्याची पालिकेत मर्दुमकी, शिवसैनिकांची अस्वस्थता चव्हाट्यावर

  • शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा आरोप
  • पक्षांतर्गत नेते, पदाधिका-यांना नगरसेवक कलाटे झाले डोईजड

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पक्षादेश धुडकावत पक्षशिस्तीचे उल्लंघन केले आहे. पक्ष नेतृत्वाने शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देवूनही महिना होत आला. तरी, कलाटे यांनी राजीनामा दिला नाही. एवढे होऊनही कलाटे यांना पक्षातीलच काही मंडळी पाठिशी घालतात. त्यामुळे पक्षाचे नगरसेवक, शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. अन्याय झालेले काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले असून पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. आगामी काळात याचा शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदासाठी  शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी देत पक्षशिस्तीचा भंग केला. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याने पक्षाने राहुल कलाटे यांना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा आदेश 24 फेब्रुवारी रोजी दिला होता. तसेच खुलासाही मागविला होता. सात दिवसात खुलासा न केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे नोटिसीत म्हटले होते. पक्षाचे नेते संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर यांनी स्वत: फोन करुन कलाटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, आदेश देवून महिना होत आला. तरी, कलाटे यांनी अद्यापर्यंत शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा दिला नाही.

त्यानंतर शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी 10 मार्च 2021 रोजी कलाटे यांना शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गटनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांकडे शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचे नोटिसीत म्हटले आहे. तरी, देखील कलाटे यांनी आजपर्यंत गटनेतेपदाचा राजीनामा दिला नाही.

पक्षाने आदेश दिला आणि कोणी ऐकले नाही असे आजपर्यंत कधीच घडले नाही. त्यावर तत्काळ कारवाई केली जाते. आदेश डावलणा-याला निलंबित केले जाते किंवा पक्षातून बेदखल केले जाते. एवढे होऊनही राहुल कलाटे यांना पक्षातीलच काही मंडळी पाठिशी घालतात. त्यामुळे पक्षाचे नगरसेवक, शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. अन्याय झालेले काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले आहेत. पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. असे असतानाही याप्रकरणाची शिवसेना नेते म्हणावी तशी दखल घेत नाहीत.

कलाटे यांच्यावर शिवसेना विरोधात काम केल्याचा आरोप

राहुल कलाटे यांनी स्थायी समिती सदस्यत्व दिलेल्या मीनल यादव यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम केले आहे. विभागप्रमुख असलेले त्यांचे पती विशाल यादव यांनी देखील विरोधात काम केले होते. पक्षाच्या विरोधात काम करणा-या नगरसेविकेला स्थायी समितीचे सदस्यपद बहाल केले आहे. त्यामुळे नाराज नगरसेवकांनी केवळ कलाटे यांचा गटनेतेपदाचाच नव्हे तर मीनल यादव यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचाही राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी नेतृत्वाकडे केली आहे. नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी असून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे जाणकारांकडून सांगितले जाते, अशी माहिती शिवसेनेच्या लेटरहेडद्वारे देण्यात आली आहे. त्यावर शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका एड. उर्मिला काळभोर यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button