‘मला सोड नाहीतर तुला जीवे मारीन’; तडीपार आरोपीची पोलिसाला धमकी
![‘Leave me alone or I will kill you’; Tadipar accused threatens police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/2Attack_20on_20police_20by_20Tadipar_20criminals-e1608085096198-1.jpeg)
पिंपरी चिंचवड | तडीपार आरोपी शहराच्या हद्दीत आला असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-याशी आरोपीने हुज्जत घातली. तसेच ‘मला सोड नाहीतर तुला जीवे मारीन’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी दापोडी गावात स्मशानभूमी जवळ घडली.स्वप्नील उर्फ सपन्या सुरेश भोई (वय 19, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई आशिष गोपी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी स्वप्नील भोई याला 22 जानेवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी पोलीस शिपाई आशिष गोपी आरोपी स्वप्नील याला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याशी झटापट केली. फिर्यादी हे पोलीस असल्याचे आरोपीला माहिती असूनही त्याने फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून ‘मला सोड, नाहीतर तुला जीवे मारीन’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.