विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना देणार ‘कानमंत्र’
![Leader of Opposition Devendra Fadnavis to give 'Kan Mantra' to office bearers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/fadnvis-1170x580-1.jpg)
पिंपरी चिंचवड मध्ये ६ मार्च रोजी फडणवीसांचा दौरा ?
विकासकामांचे उदघाटन ; नाराज नगरसेवकांशी चर्चा होण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड | शहरातील राजकारणाला आणखी वेग येणार आहे. शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ सुरु आहेत. भाजपाचे अनेक नगरसेवक पक्षाला सोडून जात आहेत. या दरम्यान आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि. ६) रोजी पिंपरी चिंचवड शहरात दौरा आयोजित केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत पुष्टी दिली आहे. विविध विकासकामांचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी नाराज नगरसेवकांशी चर्चा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर पदाधिकाऱ्यांना ते कोणता कानमंत्र देतील ? नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात फडणवीस यांना यश येते का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक आमदारांवर भाजपाचे नगरसेवक उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकत आहेत. आमदारांच्या मनमानी कारभाराची तक्रार राज्यातील नेत्यांकडे वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्याची दखल घेतली नसल्याचे नगरसेवक सांगत आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत ३ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तर आणखीन नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त होते. त्यामुळे माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नये, असा ‘मेसेज’ त्यांनी भाजपातील नाराज नगरसेवकांना दिला. या मेसेजला कोणीही दाद दिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहर भाजपाची बिघडलेली स्थिती व्यवस्थित करण्यासाठी आता फडणवीस यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे. त्यासाठी ६ मार्च रोजी पिंपरी चिंचवडचा दौरा आयोजित केला असल्याचे समजते. जवळजवळ हा दौरा निश्चित असल्याचे कळवले असल्याचे भाजपा पदाधिकारी सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे हा दौरा रद्द देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक आमदारांच्या मनमानीला रोखणार का ?
पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाच्या स्थानिक आमदारांचा मनमानी कारभार सुरु असल्याची तक्रार नगरसेवक व पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे पक्ष सोडत असल्याचे कारण, नाराज असलेले पदाधिकारी देत आहेत. पक्षावर नाराजी नसताना पक्ष सोडू नये, अशा सूचना पक्षाचे राज्यातील पदाधिकारी करत आहेत. मात्र शहरातील नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसेल अशी चर्चा आहे. पक्षाची ही घडी नीट करायची असेल तर स्थानिक आमदारांच्या मनमानीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रोखणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
या विकासकामांच्या उदघाटनाची शक्यता –
देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर सुमारे ५ ते ६ विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार आहे. या मध्ये शाहूनगर येथील सुमारे साडे ६ एकर मध्ये ‘अटलबिहारी वाजपेयी उद्यान’, उभारण्यात येत आहे. त्याचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच भोसरी येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे देखील उदघाटन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सध्या ही दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी गती दिली जात आहे.