राष्ट्रवादीला कात्रजचा घाट अन् भाजपाला चंदेरी पाट; महापालिकेत पुन्हा प्रवीण लडकतांचा थाट !
![Katraj Ghat to NCP and Chanderi Pat to BJP; The attitude of proficient boys in Municipal Corporation again!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/pravinladakat-anna-bansode-rajeshpatil.jpg)
- महापालिका आयुक्तांचा निर्णयाने राजकीय चर्चेला उधाण
पिंपरी। विशेष प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेल्या आमदार अण्णा बनसोडे यांना सत्ताधारी पक्षातील आमदार असूनही ‘नखं काढून टाकलेल्या वाघासारखी’ झाली आहे. होय, महापालिका आयुक्त असो किंवा प्रशासन बनसोडेंचा वचक राहीला नाही, असेच चित्र पहायला मिळत आहे.
याउलट, विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मात्र प्रशासनाला हाताशी धरून आपली वाट बळकट करण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्षाचा आमदार राजकीय पटलावर भारी पडतोय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा विरोध डावलून आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांची शिफारस स्वीकारुन महापालिका प्रशासनाने अखेर पाणीपुरवठ्यासाठी सेवानिवृत्त सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना सल्लागार म्हणून घेतले आहे. कोणतीही मुलाखत न घेता त्यांची ११ महिन्यांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
वास्तविक, पाणीपुरवठा विभागासाठी लडकत यांना सल्लागार म्हणून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्याला राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी विरोध केला होता. तर, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी समर्थन केले. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे बनसोडे भाजपाचे आमदार लांडगे यांना या प्रकरणात डोईजड होतील, अशी शक्यता होती. मात्र, उलटे झाले.
महापालिका आयुक्तांनी आमदार बनसोडे यांना कात्रजचा घाट दाखवला आणि भाजपाच्या आमदारांना चंदेरी पाट दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधाला झुगारुन प्रवीण लडकत यांनी सेवेत पुन्हा रुजू झाले. मंगळवारी लडकत यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. ही नियुक्ती केवळ प्रशासकीय कार्यवाहीचा भाग नसून त्याला राजकीय किनार आहे, असेच म्हणावे लागेल.
आमदार बनसोडे यांचा अपयशी ठरवण्याचा घाट…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एक विशिष्ट गट आणि भाजपातील नाराज नगरसेविकेशी संबंधित गट आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी मतदार संघात अपयशी ठरवण्यासाठी किंवा प्रभावहीन ठरवण्यासाठी कार्यरत आहे. त्यामागे २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बनसोडे यांच्या मुलावर ठेकेदार मारहाण प्रकरणात कारवाई केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मदत केली नाही. त्यामुळे बनसोडे यांनी कृष्ण प्रकाश यांच्या बदलीत मोठा ‘रोल प्ले’केल्याचे बोलले जाते. अनधिकृत टपऱ्या, पत्राशेडवरील कारवाई, त्यापूर्वी प्रवीण लडकत यांची नियुक्ती या विषयांवर राष्ट्रवादीचा विरोध झुगारुन आयुक्त राजेश पाटील यांनी निर्णय घेतले. त्यामुळे आयुक्त पाटील आता राष्ट्रवादीच्या रडारवर राहणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, प्रशासकीय पातळीवर बनसोडे कसे अपयशी ठरत आहेत, हे सिद्ध करायलाही विशिष्ट यंत्रणा कामाला लागली आहे.