‘पीसीसीओई’मध्ये ‘के-नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना
शिक्षण विश्व: उद्योग–शिक्षण दुवा अधिक मजबूत होणार!

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे ‘के-नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ या नव्या सेलची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी पीसीसीओई आणि के. नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक, पुणे यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या करारावर पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आणि के. नेस्ट कन्स्ट्रक्शन टेकचे संस्थापक व संचालक प्रशांत अग्रवाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज श्रीवास्तव, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अजय गायकवाड, संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. धीरजकुमार लाल, डॉ. विनय रंगारी आदी उपस्थित होते.
के. नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक ही कंपनी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद, मजबूत आणि किफायतशीर बांधकाम उपायांमध्ये आघाडीवर आहे. प्रीकास्ट आणि मॉड्युलर बांधकाम पद्धती, पर्यावरणपूरक व शाश्वत बांधकाम उपाय तसेच आधुनिक यंत्रणांचा वापर करून बांधकाम क्षेत्रात नवोपक्रम घडविण्यावर कंपनीचा भर आहे.
हेही वाचा – नुसतंच खाऊ नका, कशासोबत काय खाताय ते तपासा! ‘विरुद्ध आहार’ शरीरासाठी ठरू शकतो जीवघेणा
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या कराराबद्दल महाविद्यालयाच्या संचालक, प्राध्यापक व समन्वयकांचे अभिनंदन केले आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाला नवी दिशा…
या केंद्राच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंगसह अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, उद्योगाभिमुख प्रकल्पांमध्ये सहभाग आणि रोजगाराभिमुख कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच प्राध्यापकांना संशोधन व नवोपक्रमासाठी आधुनिक सुविधा मिळणार असून उद्योग व शिक्षण क्षेत्रातील समन्वय अधिक बळकट होणार आहे. पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील अभियांत्रिकी शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित उज्ज्वल करिअरच्या संधी निर्माण होतील. या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. धीरजकुमार लाल आणि डॉ. विनय रंगारी यांनी काम पाहिले.





