कुदळवाडी औद्योगिक वसाहतीत नवीन वीजखांब-दिवे बसवा!
![Install new power poles and lights in Kudalwadi Industrial Estate!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/ddaee842-6791-46ef-85d3-4a1bddcd93a6.jpg)
- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची आग्रही मागणी
- महापालिका कनिष्ठ विद्युत अभियंता दिलीप भोसले यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
कुदळवाडीत नवीन विजेचे खांब व खांबावरील नादुरुस्त दिवे हटवून नवीन दिवे बसविण्याची मागणी होत आहे. याबाबीची दखल घेत, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी ‘फ’ प्रभागाचे कनिष्ठ विद्युत अंभियंता दिलीप भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली.
कुदळवाडी हा औद्योगिक वसाहतींचा परिसर आहे. मोठ्या सुविधा अपेक्षित असताना महापालिकेचे नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष होते. परिसरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या वीजेच्या समस्याही पालिकेकडून सुटत नाहीत. या भागात विद्युत खांबांवर एलईडी लाईट लावण्यात आलेले आहेत. परंतु, त्यातील काही एलईडी लाइट बंद आहेत.
वाढत्या विस्तारीकरणामुळे विजेच्या खांबाची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. मात्र, पालिका प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करीत आहे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
अधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे आश्वासन…
तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यावेळी आयुक्तांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याचे स्मरणदेखील केले. त्यावर दिलीप भोसले यांनी कुदळवाडी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट पोल व दिवे बसविण्याकामी खर्चाची आवश्यक ती तरतूद करून समस्या निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली.