Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Inside story : स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरुन पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत खडाजंगी!

स्थानिक पातळीवर बैठकीत अप्रत्यक्ष ठराव : निवडणुकीत ज्याला तिकीट, त्याला स्वीकृत संधी नाही!

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदासाठी कुणाला संधी द्यावी? याबाबत खलबते झाली. स्वीकृत पदाच्या शर्यतीमध्ये स्थानिक आणि बाहेरचा असा जुना वाद पुन्हा एकदा राष्ट्रवादीत उफाळून आला. अखेर ‘‘ज्याला निवडणुकीत तिकीट मिळाले आहे, त्याला पुन्हा स्वीकृतसाठी संधी नको..’’ असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचे निश्चित करण्यात आले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जानेवारी- 2026 मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकूण 37 जागा मिळाल्या आहेत. 12 नगरसेवकांमागे 1 स्वीकृत सदस्य या सूत्रानुसार राष्ट्रवादीच्या वाट्यात 3 स्वीकृत नगरसेवक येणार आहेत. दुसरीकडे, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक एकूण 84 सदस्य आहेत. त्यांच्या वाट्याला एकूण 7 स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दि. 2 मार्च रोजी स्वीकृत सदस्यांकरिता नामनिर्देशन अर्ज भरावेत, अशी घोषणा केली होती. त्यामध्ये दि. 4 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याअगोदर, दि. 3 मार्च रोजी राष्ट्रवादीच्या शहरातील स्थानिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विधान सभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे असे मातब्बर नेते उपस्थित होते.

बैठकीत ‘‘ज्याला निवडणुकीत तिकीट मिळाले आहे, त्याला पुन्हा स्वीकृतसाठी संधी नको..’’ असा ठराव करण्यात आला. सदरचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र, पार्थ पवार यांनी सदरचा प्रस्ताव फेटाळला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीचे कबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना स्वीकृत नगरसेवक पद नियुक्तीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. ज्या उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यांना स्वीकृतसाठी संधी देण्यात येणार नाही. त्यानी पुढची पाच वर्षे पक्षाचे काम करावे, असे म्हटले होते. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी केली असावी, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

मातब्बर नेत्यांची मोर्चेबांधणी…

माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांचा मुगला माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांच्यासाठी स्वीकृत नगरसेवकपदाची मागणी केली आहे. दुसरीकडे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. सांगली- सातारा- कोल्हापूर भागाचे प्रतिनिधीत्व करणारा आणि महापालिका प्रशासनाच्या कामकाजाची माहिती असणारा, तसेच प्रभावीपणे पक्षाची भूमिका मांडू शकेल, असा चेहरा स्वीकृत नगरसेवकपदासाठी नियुक्ती करावा, असाही विचार मांडण्यात येत आहे. त्या अनुशंगाने विनायक रणसुबे यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे, फझल शेख, निहाल पानसरे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे यांनीही संधी मिळावी, या करिता मागणी केल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button