माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या वतीने “हर घर तिरंगा” उपक्रमास सुरुवात
![Initiation of "Har Ghar Tiranga" initiative on behalf of ma corporator Prof Uttam Kendale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-11.43.34-AM-1.jpeg)
- निगडी भागात मोफत राष्ट्रध्वज वाटपास सुरुवात : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे : केंदळे
पिंपरी चिंचवड | हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. त्याला अनुसरून प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी, यमुनानगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत या भागात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम आमदार महेशदादा लांडगे यांच्या सुचनेनुसार भाजपाचे मा नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने राबविण्यास सुरुवात झाली असून मोफत तिरंगी ध्वज भाजपा जनसंपर्क कार्यालय सातेरी देवी मंदिर समोर मुक्ताई उद्यान यमुनानगर निगडी येथे वाटप करण्यात येत आहेत. आज (दि.९) अनेकांना तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केंदळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात राहावी, या उददेशाने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येकाने ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.तिरंगा मोफत हवा असल्यास भाजपच्या निगडीतील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.आपल्या देशाप्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात निगडी भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन केंदळे यांनी केले