पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठे देशी गोवंश अन् अश्व प्रदर्शन
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा पुढाकार : यंदा सिनेकलावंतांसोबत रंगणार खिल्लार रॅम्पवॉक
![India's largest indigenous cattle and horse exhibition in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Indias-largest-indigenous-cattle-and-horse-exhibition-in-Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. 1 आणि 2 मार्च 2025रोजी देशी गोवंश तसेच अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोसा, काजळी, देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध प्रकारातील गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या निमित्ताने सिने कलावंतांसह खिलार रॅम्प ऑफ देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, पशु प्रेमींसाठी प्रदर्शनस्थळी जनावरांची खरेदी-विक्री बाजार देखील भरविण्यात येणार आहे.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून देशी गोवंश व अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे. मोशी येथील हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हे प्रदर्शन होणार आहे. गोवंश आणि अश्व प्रदर्शनाच्या माध्यमातून कोसा, काजळी, देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध प्रकारातील गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही दि. २३ फेब्रुवारी असून, सहभागी गोवंश प्रदर्शनस्थळी २८ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी 8862909090 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? राहुल गांधी
जातिवंत गोवंश स्पर्धा ठरणार आकर्षण :
गाय आणि बैल गटामध्ये कोसा, काजळी , गाजरी खिल्लार , कपिला अशा जातिवंत गोवंश स्पर्धा रंगतील. मारवाडी अश्व ,खिल्लार बैलजोडी, पंढरपुरी म्हैस, रेडा यांच्यातील स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहेत. यासाठी आकर्षक बक्षिसे देखील आयोजकांनी मार्फत ठेवण्यात आली आहेत.
प्रदर्शनासाठी नियम व अटी :
कमीत-कमी एका गटात १० गोवंश असणे आवश्यक आहे.काजळी आणि कोसा गटामध्ये संख्या जास्त आली,तर गट वेगळे केले जातील.पंच गोवंशाची निवड करण्याअगोदर तुम्हाला यापुर्वी मिळालेल्या बक्षिसांचा विचार करणार नाही. निवड पूर्णपणे पंचांच्या निवड प्रक्रियेने होईल. ७५ कि.मी पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या गोवंश पालकांना काही प्रमाणात वाहतूक भाडे मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये गैरवर्तन करणाऱ्या पशुपालकास पुढील ३ वर्षांसाठी बंदी राहील, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी दिली.