इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपा शाश्वत विकासाचा अजेंडा!
पॅनेलप्रमुख विलास मडिगेरी : विकासाच्या मुद्यांवर भाजपाचा विजय निश्चित

पिंपरी-चिंचवड | इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाने विकास, पारदर्शकता आणि सेवा या मुद्द्यांवर आधारित निवडणूक रणनिती मांडली असून, या प्रभागातून चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या चौघांमध्ये विलास मडिगेरी हे प्रमुख चेहरा म्हणून पुढे येत असून, केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
प्रभागातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक सेक्टरमध्ये झालेल्या विकासकामांचे दस्तऐवजीकरण सादर करत “केवळ आश्वासनं नाही, तर प्रत्यक्ष काम हा आमचा अजेंडा आहे,” असे विलास मडिगेरी यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेपेक्षा नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान अधिक महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपकडून या प्रभागात (अ) डॉ. कांबळे सुहास लक्ष्मण, (ब) सौ. लोंढे नम्रता योगेश, (क) सौ. लांडगे नीलम शिवराज आणि (ड) श्री. मडिगेरी विलास हनुमंतराव हे चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत. चौघेही मिळून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादीच्या रणरागिणी मैदानात
निवडून आल्यानंतरच्या पहिल्या १०० दिवसांत भोसरी विधानसभा मतदारसंघातील तसेच प्रभाग क्रमांक ८ मधील प्रलंबित कामे पूर्ण करणे, रस्ते, पेव्हिंग ब्लॉक्स, पाणीपुरवठा व दैनंदिन देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लावणे, हे प्रमुख प्राधान्यक्रम असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले. याशिवाय सेक्टर ७ मध्ये अत्याधुनिक स्विमिंग पूल, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पाठीमागील जागेत उद्याने व क्रीडांगणे आणि भारतातील पहिले भव्य ‘संविधान भवन’ उभारण्याचा संकल्पही या चारही उमेदवारांच्या विकास आराखड्यात समाविष्ट आहे.
२०२२ मधील प्रभाग फेररचनेच्या वेळी विलास मडिगेरी यांनी अधिकृत हरकत नोंदवत प्रभाग ८ च्या हक्कासाठी लढा दिला. प्रभाग पूर्ववत होईपर्यंत उमेदवारी जाहीर न करण्याचा त्यांचा निर्धार अखेर यशस्वी ठरला, याची दखल नागरिकांकडून घेतली जात आहे.
कोरोनाच्या काळात भाजपच्या या उमेदवारांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. विशेषतः विलास मडिगेरी यांच्या नेतृत्वाखाली सलग ५३ दिवस दररोज हजारो गरजू नागरिकांना जेवण व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, कमळ हे निवडणूक चिन्ह आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन मैदानात उतरलेले हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मधील प्रत्येक नागरिकाचा विकास हा माझा शब्द आहे. केवळ आश्वासनं नाही, तर वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक काम करून दाखवणं हीच माझी बांधिलकी आहे. जनतेचा विश्वास हाच माझा खरा विजय आहे.
– विलास मडिगेरी, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 8.




