Pimpri Chinchwad | थेरगाव, वाकड परिसरात अशुद्ध आणि दूषित पाणी
![Impure and contaminated water in Thergaon, Wakad area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Pimpri-Chinchwad-3-780x470.jpg)
पिंपरी | हिंजवडी परिसरातील सोसायटीत पिण्याच्या पाण्यात अळी सापडल्याची घटना ताजी असताना, थेरगाव-वाकड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरापासून वाकड रस्त्यावरील एकता कॉलनी, गणेश कॉलनी, मंगलनगर या भागात नागरिकांना ही समस्या भेडसावत आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात महापालिकेच्या वतीने दिवसाआड पाणी देण्यात येते. परिणामी, पाण्याचा अपुरा व कमी दाब जाणवतो. थेरगाव, वाकड या परिसरात नुकतीच जलवाहिनी बदलण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्याप पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. त्यातच आता दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गणेशनगर, एकता कॉलनी या परिसरात नळावाटे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेच्या विभागात केल्या आहेत, तर काही ठिकाणी पाण्यातून गाळ येत असल्याच्या तक्रारीसुद्धा आहेत.
हेही वाचा – ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर..’; बबनराव तायवाडेंचा थेट इशारा
हिंजवडी येथील एका सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वॉटर फिल्टरमध्ये लाल रंगाच्या अळ्या आढळून आल्या. ही घटना ताजी असतानाच त्यानजीकच असलेल्या वाकड परिसरात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. दिवसाआड पाणी सोडत असल्याने नाईलाजास्तव तेच पाणी वापरावे लागत असल्याचे येथील नागरिक सांगतात. येथील गल्ली क्रमांक ६ या ठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास कळवूनही तेथे कोणी आले नाही, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. ते मदतीची अपेक्षा करीत असून, तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा त्रास नागरिकांना होत असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.