‘आरटीओ’ च्या सुधारित आकृतीबंधाची अंमलबजावणी करा : दीपक मोढवे-पाटील
![Implement Revised Structure of 'RTO': Deepak Modve-Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/DIPAK-MONDHAVE-PATIL-780x470.jpg)
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
- प्रशासकीय सुसूत्रतेसाठी कार्यवाहीची मागणी
पिंपरी। प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुधारित आकृतीबंध आणि ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत मंजूर झालेल्या प्रस्तावाची तात्काळ अंमलबजाणी करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील ‘आरटीओ’ व ‘डेप्युटी आरटीओ’ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमतोल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
तसेच, राज्यात १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. त्यात आता आणखी नऊची भर पडणार आहे. पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकोला, बोरिवली व सातारा या ‘डेप्युटी आरटीओ’ कार्यालयांचा दर्जा वाढवून त्यांना आता ‘आरटीओ’चा दर्जा देण्याचे प्रस्तावित आहे.
विविध वाहनांचे पासिंग, ओव्हरलोड वाहतूक रोखणे, महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावणे आदी प्रमुख जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन खात्यात मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध सादर करण्यात आला आहे. त्याचवेळी ‘डेप्युटी आरटीओ’ची नऊ कार्यालये अपग्रेड करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
परिवहन विभागात राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ४ हजार २३५ पदे मंजूर आहेत. परंतु, नव्या आकृतिबंधात ही संख्या ३ हजार ८२३ वर आणण्यात आली आहे. त्यात ४१२ ने घट झाली आहे. सहपरिवहन आयुक्तांची पाच, आरटीओची १२, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तब्बल ७४ पदे वाढली आहेत, अशी माहिती दीपक मोढवे-पाटील यांनी दिली.
**
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामाचा वाढता व्याप आणि वाहणांची संख्या पाहता प्रादेशिक कार्यालय म्हणून अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे. याबाबत प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असून, त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी. तसेच, नव्या आकृतीबंधानुसार पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करुन पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाहनचालक, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आहे.
- दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, भाजपा वाहतूक आघाडी, पिंपरी-चिंचवड.