अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग
पिंपरी l प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या घरच्यांना फोन करून तिच्यासोबत लग्न लाऊन द्या, नाहीतर आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना देहूरोड ते तळेगाव या दरम्यान 11 एप्रिल रोजी घडली.
रोशन राजू पवार (वय 22, रा. झव्हेरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 42 वर्षीय महिलेने रविवारी (दि.15) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 13 वर्षीय मुलीचा आरोपीने पाठलाग केला. ‘तू माझ्या गाडीवर बस नाहीतर मी तुझ्या मम्मी पप्पाकडे बघून घेतो’, अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर मुलीचा हात पकडून तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने त्याच्या मोबाइल वरून फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाइलवर फोन करून ‘तुमच्या मुली सोबत माझे लग्न लावून द्या. नाहीतर मी आत्महत्या करतो’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.