रहाटणीतील भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, मागील प्रवाशाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड | रहाटणी परिसरातील शिवार चौकाजवळ शुक्रवारी (दि. ३ एप्रिल २०२६) रात्री सुमारे ८.४० वाजता झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात होऊन मागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश लक्ष्मण गायकवाड (वय २८, रा. दिघी) हे पीएमटी बस (एमएच १२ वायबी ३७०५) चालवत असताना, समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच १५ डिझेड २४२६, पॅशन प्रो) चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बीआरटी लेनमध्ये नो-एन्ट्री असताना निष्काळजीपणे वाहन चालवले.
हेही वाचा : “खडकवासल्याच्या निसर्ग साक्षीने रंगला आठवणींचा मेळा”
दरम्यान, दुचाकीस्वाराने समोरील चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून बस येत असल्याचे लक्षात येताच त्याने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून बसच्या खाली जाऊन जोरात धडकली.
या अपघातात दुचाकी चालक अभिषेक पुंडलीक शेरमाळे (वय २६, रा. रहाटणी) याचा उजवा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. तर मागे बसलेला सागर भागवत देवरे (वय ३०) याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (बी), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करीत आहेत.





