पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-96-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. 18) मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. सोसायट्यांमध्ये पाणी साचले. काही सोसायट्यांच्या सीमा भिंत फोडून साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले.
रविवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता. दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले. सायंकाळी अचानक ढग दाटून आले. तसेच मुसळधार पाऊस पडला. शहराच्या अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरले. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
हेही वाचा – ‘लाडकी बहिण योजनाला आम्ही आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्कम देऊ’; आदित्य ठाकरेंची खोचक टीका
थेरगाव मधील सुंदर कॉलनी आणि परिसरात सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पाणी भरले. याबाबत अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी सोसायटीची सीमा भिंत फोडून साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिला.
पिंपरी मधील वायसीएम चौकात देखील पाणी साचले. घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. चिंचवड मध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचले. या पाण्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला.