जागृती मंचतर्फे युवकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

आळंदी | MIT Arts, Commerce & Science College, आळंदी येथील जागृती मंच यांच्या वतीने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये “आजचा युवक, सामाजिक अपेक्षा आणि सर्वांगीण विकास” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा विशेष कार्यक्रम विद्यार्थी व पुरुष कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. रत्नाकर चंदाजकर सर उपस्थित होते. त्यांनी आजच्या युवकांवर असलेल्या सामाजिक अपेक्षा, करिअरचा ताण, कुटुंबीयांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या आकांक्षांमधील संघर्ष यावर अतिशय साध्या व प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले. युवकांनी मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे, तसेच जीवनात संतुलन राखणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) डॉ. सुनील महाजन सर होते. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि जबाबदार नागरिकत्व विकसित होते, असे मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा : पंढरपूरच्या विठ्ठलाचे निष्ठावंत भक्त गणपत तात्याबा जानभरे यांचे दुःखद निधन
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जागृती मंचचे समन्वयक श्री. दिनकर राठोड सर व प्रा. दीक्षा कदम यांनी केले. तसेच जागृती मंचचे सदस्य प्रा. अनिता अटिवडकर, प्रा. ज्योती बच्छाव, प्रा. रश्मी पाठक आणि प्रा. कविता सांदभोर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात व अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य केले.
याच वेळी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “सामाजिक दबाव आणि शैक्षणिक अपेक्षा”, “आजच्या युवकांचे मानसिक आरोग्य”, “करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल”, “युवकांच्या विकासात कुटुंब व समाजाची भूमिका” तसेच “भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व-देखभाल” या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक व विचारप्रवर्तक पोस्टर सादर केली.
उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक अपेक्षांशी सकारात्मक पद्धतीने सामना करण्याची दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




