तृतीयपंथीय होणार आता रखवालदार !
आयुक्तांची मंजुरी : पिंपरी महापालिकेचा आदर्शवत निर्णय
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यास तसेच तृतीयपंथीयांना रखवालदार, मदतनीस व ग्रीन मार्शल पथकातील कामकाजाकरीता नेमणूक करण्यास प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच समाजातील वंचित घटकांना समाजामध्ये सामावून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार असल्याचे सांगितले होते. त्या दृष्टीने त्यांनी तृतीयपंथीयांना रखवालदार मदतनीस , ग्रीन मार्शल पथकातील कामकाजाकरिता नेमणूक करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा निर्णय राज्यातील महानगरपालिकांना आदर्शवत ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुमारे 200 च्या आसपास उद्याने आहेत. याशिवाय महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी इमारती कार्यान्वित आहेत. महापालिकेच्या हद्दीतील रस्ते अशा अनुषंगिक बाबींसाठी रखवालदार तसेच मदतनीस म्हणून हे तृतीयपंथीय काम पाहतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
झिरो वेस्ट प्रकल्पाला मंजुरी
महापालिकेच्या शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चास तसेच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन आणि सॅनिटरी नॅपकीन इन्सिनरेटर मशीन खरेदी करणे, प्रभाग क्र. 21 मधील आरक्षण क्रमांक 173 येथे खेळाचे मैदान विकसित करणे, प्रभाग क्र. 1 मधील सोनवणे वस्ती येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी कामासदेखील प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.