विश्वकल्याण स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रॅन्डपॅरेंट्स डे’ उत्साहात
- शहरीकरणात दुरावलेले नाते घट्ट कऱण्यासाठी शाळेतील हा आदर्श उपक्रम
पिंपरी : शहरीकरण आणि लघु कुटुंबपद्धतीच्या आजच्या जमान्यात आजी-आजोबा हे नाते दुरावले आहे. मात्र, हे दुरावलेले नाते घट्ट करण्यासाठीचिखलीतील विश्वकल्याण स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आजी-आजोबा दिन साजरा कऱण्यात आला. या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये आजी-आजोबांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली.
चिखलीतील सोनवणे वस्तीमधील विश्वकल्याण स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक जितेंद्र मेहता, शाळेच्या संचालिका नीलम मेहता उपस्थित होते.
आजी आजोबांविषयी लहान मुलामुलीत आदराची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला.आपल्या आजी-आजोबांचे स्वागत चिमुकल्यानी सुंदर नृत्याविष्काराने केले. या उपक्रमासाठी ८० पेक्षा जास्त आजी-आजोबांनी सहभाग नोंदवला होता. पूर्व प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी भाषण, खेळ आणि नृत्याचे आयोजन केले होते. सर्व आजी आजोबांनी त्यांच्यासाठी आयोजित खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या आजी आजोबांना बक्षिसेही देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले. यावेळी काही आजी आजोबांनी आपले जीवनानुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीछाया पवार यांचे भाषण आणि आपल्या चिमुकल्यांच्या सादरीकरणाने आजी-आजोबा प्रभावित झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भारती भदाणे यांनी केले. तर नर्सरीमधील त्या चिमुकल्यांचे बोबडे बोल असणारे भाषण झाले. त्यामध्ये मिधी, आश्रिता, चित्रा, गुप्ता कुमार, अव्दिता लांडे आणि शिव चौधरी यांचा सहभाग होता.