GOOD NEWS : पिंपरी-चिंचवडकरांसाठी कोरोना चाचणी विनामूल्य करण्याबाबत सर्वपक्षीय एकमत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/dada.jpg)
आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्याकडून शहरवासीयांना दिलासा
महापालिका स्थायी समिती सभेत नागरी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने दिलासादायक निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी विनामूल्य करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका स्थायी समिती सभेत महत्तपूर्ण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर प्रभावीपणे नियोजन केले आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत ‘मेगा सिटी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापतरी परिस्थिती नियंत्रणात आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी शहरातील नागरिकांची कोरोना चाचणी विनामूल्य करावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्यास अनुसरून नगरसेवक पंकल भालेकर यांनी अनुमोदन दिले होते. या प्रस्तावर सर्वपक्षीय चर्चा झाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष लोंढे यांनी निर्णय जाहीर केला.
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येविषयी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. ज्या व्यक्तीला लक्षणे जाणवतात, तोच तपासणीसाठी पुढे येतो आहे. इतरांचे काय? असा प्रश्न आहे. अधिकाधिक नागरिकांनी स्वत:ची तपासणी करण्याच्या हेतूने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील तपासणी विनामूल्य करावी, अशा मागणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास समितीने सर्वानुमते मान्यता दिली. याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची, याचे . नयोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.