Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मंत्रिपद, विधानपरिषद द्या’

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद देण्याची मागणी शहर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने केली आहे. पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करून पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पाठविला आहे. शिवाय, शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषद देण्याचीही मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरावर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर आता सर्वपक्षीयांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ताकद देण्याची मागणी शहर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) केली जात आहे. विधानसभेला महायुतीत राष्ट्रवादीला केवळ पिंपरीची जागा मिळाली. पिंपरीतून अण्णा बनसोडे तिसऱ्यांदा विजयी झाली आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेवर सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

हेही वाचा –  राज्यातील ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

अजित पवार शहराचे कारभारी होते. त्यांच्या कलानेच शहरातील सर्व निर्णय होत होते. मात्र, २०१७ मध्ये भाजपने अजित पवार यांच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेत भाजपचे कमळ फुलले. विकासकामे करूनही सत्ता गेल्याची सल पवार यांनी वारंवार बोलून दाखविली. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. सत्तेत सहभागी होताच महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शहरातील एकमेव आमदार बनसोडे यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. भाजपने शहरात विधान परिषदेचे दोन आमदार दिले. त्यामुळे शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, असा ठरावही बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेची स्थापना होऊन ४२ वर्षे झाली. परंतु, अद्याप एकदाही शहराला मंत्रिपद मिळालेले नाही. शहराची लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी तिसऱ्यांदा निवडून आलेल्या अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे, असा ठराव केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button