breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या जीआयएस प्रकल्पाला “स्मार्ट ऍडव्हान्स टेक्नोलॉजी ऍडोप्शन” पुरस्कार

'महानगरपालिकेच्या गतिविधींसाठी देशात एकमेव ठरलेल्या जीआयएस प्रकल्पाचा दिल्लीत गौरव होणे ही अभिमानाची बाब'; आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : महानगरपालिकेचे सर्व विभाग “जीआयएस प्रणाली”द्वारे जोडणारा जीआयएस प्रकल्प भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प ठरला आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला नवी दिल्ली येथे स्मार्ट सिटीज इंडिया अवॉर्डमध्ये “स्मार्ट ऍडव्हान्स टेक्नोलॉजी ऍडोप्शन” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे राष्ट्रीय स्तरावर पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंग खरोला IAS (निवृत्त), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहसचिव ए. धनलक्ष्मी, मॉस्कोचे बाह्य आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रमुख सेर्गेई चेरेमिन, प्रदर्शने भारत समूह व्यवस्थापकीय संचालक चंद्रिका बहल यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, बिनीश सुरेंद्रन यांनी हा पुरस्कार स्विकारला.

भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे दि. १७ ते १९ जानेवारी २०२३ या कालावधीत ९ व्या स्मार्ट सिटीज इंडिया २०२४ आणि ३१ कन्व्हर्जन्स इंडिया २०२४ एक्स्पो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, “जीआयएस सक्षम इआरपी” प्रकल्प प्रभावी ठरला.

पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील ६ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) १००० हून अधिक प्रक्रियांवर व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात आली आहे. ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, GIS ची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडण्यात आली आहे. जेणेकरून PCMC चा GIS डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे होणार उद्घाटन

प्रकल्पाची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये :-

जीआयएस, ईआरपी आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहेत. संपूर्ण शहरासाठी लायडर (LiDAR) सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाद्वारे १० सेंटीमीटर एवढी लहान वस्तू देखील अचूकतेने सहजपणे मोजली जाऊ शकते. झोपडपट्ट्यांमध्ये बॅकपॅकच्या सहाय्याने LiDAR सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याद्वारे संपूर्ण शहर ३६०-डिग्रीमध्ये टिपले गेले आहे. उत्तम प्रशासनासाठी GIS बेस मॅपसह एकत्रित करून अधिकार्‍यांकडून मालमत्तांना प्रत्यक्ष भेट न देताही पडताळणी केली जाऊ शकते. GIS डेटाबेसमध्ये २६०+ GIS स्तर जोडले गेले असून ज्यामध्ये पाईप लाईन, ड्रेनेज लाईन इत्यादी भूमिगत उपयुक्ततेचे संपूर्ण नेटवर्क आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील उपग्रहाची डिजिटल प्रतिमेची खरेदी दर ६ महिन्यांनी नियमितपणे केली जाणार आहे. या तंत्रज्ञानाने अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमण इत्यादी शोधून त्यानुसार योग्य नियोजन किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये शहराचे दृश्य 3D प्रतिमेमध्ये उपलब्ध आहे. शहराच्या भूभागाचा अभ्यास करण्यासाठी आणि पाणी अडवण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी शहराचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (DEM) तयार करण्यातही ते मदत करेल. महापालिकेच्या गतिविधींसाठी ३५ हून अधिक आयटी ऍप्लिकेशन्स एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात असून हे मॉड्यूल ४० हून अधिक महापालिकेतील विभागांमध्ये लागू केले जात आहेत. नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ करणे आणि महानगरपालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उददेशाने जीआयएस सक्षम इआरपी प्रणालीद्वारे नागरिकांना एका क्लिकवर इत्यंभूत सेवांची माहिती देण्यासाठी “सिटिझन जिओपोर्टल” सूरू करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २० विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी “पीसीएमसी जिओपोर्टल्स” सूरू करण्यात आले आहे. या कार्यप्रणालीनुसार मनपाच्या संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना एका क्लिकवर आपल्या कार्यक्षेत्रानुसार मनपाच्या सुविधांची (उदा. रस्ते, पाण्याची टाकी, पोल्स, फुटपाथ, उद्याने, प्रभागानुसार क्षेत्र, क्रीडांगणे, मनपा मालमत्ता आदी) ठिकाणे अशा ३०० पेक्षा जास्त स्तर पाहता येणार आहे. स्थापत्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, विद्युत विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, अग्निशामक विभाग, उद्यान विभाग, आरोग्य विभाग, भूमी आणि जिंदगी, वैद्यकीय विभाग, कर संकलन, समाज विकास विभाग, जलनि:स्सारण, आकाश चिन्ह परवाना, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा विभाग, अणुविद्युत व दूरसंचार, नगररचना, पशुवैद्यकीय, पाणी पुरवठा या विभागांसाठी प्रथमत: “पीसीएमसी जिओपोर्टल्स” सूरू करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत सूरू असलेल्या “जीआयएस सक्षम इआरपी” (GIS enabled integrated ERP) हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मनपा विभागांना जोडणारा “जीआयएस सक्षम एकात्मिक ईआरपी” हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व विभाग भौगोलिक माहिती प्रणालीसोबत ‛इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंग’ द्वारे एकत्रित केले आहेत. तसेच, नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून मनपा विभाग आणि नागरिकांना ऑनलाईन सेवा उपभोगता येणार आहेत. नागरिकांना उपयुक्त सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे पिंपरी चिंचवडचा सन्मान होणे ही सर्व शहर वासियांसाठी गौरवाची बाब आहे.

– शेखर सिंह, आयुक्त- पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button