फ्रेंडशीप डे सेलिब्रेशन : भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणतात… ‘‘ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों…’’ पण…!
- राजकारणापलिकडे मैत्री जपताना पक्षीय शिष्टाचाराचे भान ठेवले पाहिजे
- भाजपा अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये ‘दिल- दोस्ती- दुनियादारी’ची चर्चा
पिंपरी । अधिक दिवे
मैत्री दिन… प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी दिवस. रविवारी हा ‘फ्रेंडशीप डे’ अबालवृद्धांनी साजरा केला. वेगवेगळ्या राजकीय पक्ष- विचारधारांमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते आणि नेते राजकारणा पलिकडील मैत्री जपतात, यात गैर काहीच नाही. अशीच मैत्री आहे पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि टीमची. आमदार लांडगे यांनी मित्रांसोबत ‘ऑन स्टेज परफॉर्मन्स’ करतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. अवघ्या काही मिनिटांत हा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला नेटिझन्सची दाद मिळत आहे. पण, आमदार लांडगे आणि ग्रुपने पक्षीय शिष्टाचारही जपला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजकारणापलिकडे मैत्री जपली जात आहे… याचे स्वागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत दुसरीकडे स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, स्व. विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचेही किस्से सांगितले जातात. पण, प्रत्येकाने पक्षाचा शिष्टाचारही जोपासला.
आमदार लांडगे यांच्या ग्रुपमध्ये भाजपाचे राजेश पिल्ले, शांताराम भालेकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांचा समावेश आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे आणि विरोधी पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. तरीही या सहाजणांनी स्टेजवर एकत्र डान्स केला आहे. ‘‘ ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों…’’ पासून ‘‘ मैं हूँ डॉन…’’ पर्यंत अनेक गाण्यांवर ठेका धरलेला पहायला मिळतो. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ दिलखुलास मित्रांनी चहा पार्टी केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इथपर्यंत सर्वगोष्टींचे स्वागत आहे. पण, आगामी महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी तगडा सामना होणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष हे आमदार लांडगे आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे राजू मिसाळ हे विरोधी पक्षनेता या महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या कोणत्याही कृतीचा किंवा राजू मिसाळ यांच्या कुठल्याही भूमिकेचा थेट परिणाम भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर होणार आहे. ‘लढाई’ तोंडावर असताना दोन्ही बाजुंचे महत्त्वाचे ‘शिलेदार’ आपल्या मैत्रीचा संदेश देत असतील, तर सैनिकांचे आत्मबल खचले जाईल, ही बाबही या दोस्तांनी लक्षात घेतली पाहिजे.
https://www.facebook.com/394208647274977/posts/4727299630632502/
पक्षश्रेष्ठींकडून विचारणा होण्याची शक्यता…
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षशिस्तीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यासोबत केलेल्या डान्सबद्दल आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह राजेश पिल्ले, शांताराम भालेकर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून विचारणा होवू शकते. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांनाही राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठी जाब विचारु शकतात, अशी स्थिती आहे. कारण, राजकारणापलिकडील मैत्री जपताना आपल्या पक्षाची आणि पदाची ‘गरिमा’ जपली पाहिजे, अशी भाजपा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.