मोठे पॅकेज, ट्रिप देण्याचे आमिष दाखवून कंपनीची मेंबरशिप घ्यायला लावत साडेसात लाखांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/cheating-crime.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
खोटे आमिष दाखवून कंपनीची मेंबरशिप घ्यायला लावत सात जणांची सात लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2017 ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.
याप्रकरणी अनिल सदाशिव गावडे (वय 48, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्शद खान, डायरेक्टर बलराम पटेल, सिनियर मॅनेजर आफताब शेख, मॅनेजर राम, अजय चव्हाण, कस्टमर एक्झिक्यूटिव्ह शुभम, प्रदीप, सायमा, निलेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अनिल गावडे तसेच अंकित दीपक शाह (वय 35, रा. वाकड), कृष्णराज प्रभाकर (वय 39, रा. वाकड), मंगेश गिरीश जोशी (वय 20, रा. मोशी), रत्नदीप खाशाबा करे (वय 32, रा. आंबेगाव पठार), किरण मधुकर सावळे (वय 41, रा. पिंपळे गुरव), राहुल अजय जयस्वाल (वय 35, रा. सुसगाव) या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना खोटे आमिष दाखवले. सर्वांचा विश्वास संपादन करून त्यांना आरोपींच्या कंपनीची मेंबरशिप घेण्यासाठी आग्रह केला. मेंबरशिप घेतल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे कोणतेही पॅकेज न देता तसेच कोणतीही ट्रीप दिली नाही. फिर्यादी यांनी 2 लाख 89 हजार तसेच अन्य व्यक्तींनी चार लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. एकूण सात लाख 54 हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी आणि अन्य सहा जणांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.