चिंचवड, चाकण, देहूरोड मधून चार दुचाकी तर चिखली मधून सायलेन्सर चोरीला
![Four two-wheelers stolen from Chinchwad, Chakan, Dehu Road and silencer stolen from Chikhali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/theft-bike-run.jpg)
पिंपरी चिंचवड | शहरातील वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. वाहन चोरटे जोमात असून चिंचवड, चाकण आणि देहूरोड मधून चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच चिखली मधून एका कारचा सायलेन्सर चोरून नेला आहे. याबाबत सोमवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुहास उमेश निकम (वय 27, रा. अहिर इस्टेट, संतोषनगर, चिंचवड) यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. निकम यांनी 9 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाचार वाजता त्यांची दुचाकी चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल कॅन्सर बिल्डिंगच्या पाठीमागे दुचाकी पार्क केली. ते टॉयलेटवरून परत येईपर्यंत चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
गणेश रमेश ठेंगल (वय 23, रा. निघोजे, ता. खेड) यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी आणि बेवरा भानुदास वायचाळ यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 15) रात्री नऊ ते सोमवारी (दि. 16) पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
युवराज युनूस गायकवाड (वय 34, रा. वाल्हेकरवाडी) यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 15) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
बरकत सुभान खॉं (वय 43, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची इको कार त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. त्यावेळी त्यांच्या इको गाडीचा 40 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.