पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरीच्या चार घटना
![Under the pretext of giving gold at a low price, he took it and threw chilli powder in his mouth and snatched Rs 9 lakh in cash.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/bag-theft.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, सांगवी, चिखली आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या चार घटनांमध्ये एक लाख सहा हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
आरती निलेश धंदर (वय 27, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या पतीला हातगाडीवर भाजी लावण्यास मदत करत होत्या. भाजी लावल्यानंतर त्यांचे पती भाजीविक्रीसाठी निघाले. काही अंतर केल्यानंतर एक गोणी घरी राहिल्याने फिर्यादी ते देण्यासाठी गेल्या. गोणी देऊन घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
श्रीपाद बाळासाहेब शिंदे (वय 30, रा. रहाटणी, काळेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली. शनिवारी (दि. 18) दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी पिंपळे गुरव मधील तुळजाभवानी मंदिर येथे फूटपाथवर मोबाईलवर बोलत थांबले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
मतीन अकबर कुरेशी (वय 28, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल यादव (वय 22), मोहित संजय सिंग (वय 21, दोघे रा. काळेवाडी), एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता फिर्यादी चांदणी चौक, खराळवाडी येथे रस्त्यावरील भंगार व कचरा गोळा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. मारून वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना काचा फोडण्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करत ‘मी नढेनगरचा भाई आहे’ असे म्हणून फिर्यादीच्या खिशातून 600 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. जाताना आरोपींनी कोयते हवेत फिरवून आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
हरिवंदा तात्यासाहेब शिंदे (वय 36, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी धुण्याभांड्याचे काम करतात. शनिवारी (दि. 18) रात्री साडेसात वाजता त्या बर्डव्हॅली ते चेरी चौक रोडवरून एका सोसायटीमधून दुस-या सोसायटीत काम करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजारांचे मिनी गंठण चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.