आयुक्तसाहेब… तर, स्मशानभूमीत वर्ग घ्यावा लागेल!
महिलांच्या वर्गांसाठी जागेअभावी माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा प्रशासनाला इशारा!

पिंपरी- चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व कौशल्यवर्धनाच्या वर्गांसाठी जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वर्गांसाठी योग्य जागा उपलब्ध न झाल्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट आयुक्तांना पत्र देत प्रशासनाला जाब विचारला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, उद्यान विभागाने बांधलेला सुमारे २००० स्क्वेअर फूटचा हॉल सद्यस्थितीत काही जेष्ठ नागरिकांच्या ताब्यात असून, त्याठिकाणी महिलांचे वर्ग घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कामठे यांनी हॉल महिलांच्या वर्गांसाठी नियमित उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, जेष्ठ नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पूर्णवेळ वापराची मुभा द्यावी, असा तोडगाही सुचवला आहे.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
कामठे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर वेळेत निर्णय घेण्यात आला नाही, तर महिलांना वर्ग घेण्यासाठी स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जावे लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल. ही बाब महिला सक्षमीकरणाच्या दिशेने कार्यरत असलेल्या महापालिकेसाठी अत्यंत गंभीर असून, आता प्रशासन याकडे कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महिलांच्या शिक्षणासाठी आणि स्वावलंबनासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतो. मात्र, महानगरपालिकेच्याच हॉलवर अतिक्रमण झाल्यामुळे वर्ग घेणे अशक्य झाले आहे. जर प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही, तर महिलांना वर्ग स्मशानभूमीत घ्यावे लागतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.
– तुषार कामठे,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार).





