‘पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पहिल्यांदाच गुन्हेगारीत लक्षणीय घट’; पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी : चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रथमच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे, शस्त्रसाठा आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई केल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या कालावधीत ४५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल २१३ आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच ३५ गुन्हेगारांना MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध, तर ३६८ गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आले. या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी घट झाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
२०२५ या वर्षात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ५ हजार ८१८ गुन्हे दाखल करून १६ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत २०५ गुन्हे दाखल, तर २५३ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २४३ पिस्तुल आणि ३९५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा – गोरेगावमध्ये 14 ते 16 जानेवारीदरम्यान वाहतूक निर्बंध लागू
सायबर गुन्हेगारीवरही नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात २१५ आरोपींना अटक करण्यात आली असून २४ कोटी ३८ लाख रुपये पीडितांना परत देण्यात आले आहेत. हत्येच्या घटनांबाबत माहिती देताना पोलिस आयुक्तांनी सांगितले की, २०२४ मध्ये शहरात ८५ हत्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये ही संख्या घटून ६३ वर आली आहे. यापैकी ६२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. वाहनचोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्येही पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
महिला सुरक्षेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात ३०१ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच ३९२ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ३८२ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. एकूणच शहरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात पोलिस यंत्रणेला यश आले असल्याचा दावा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केला. या पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह शशिकांत महावरकर, सारंग आवाड आणि बसवराज तेली आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.




