ताथवडेत पकडला नगरवरून विक्रीसाठी आणलेल्या पाच लाखांचा गांजा
![Five lakh cannabis brought for sale from town caught in Tathwade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/11-kg-ganja-found-with-ganja-smuggler-.jpg)
प्रतिनिधी
पिंपरी – विक्री करण्यासाठी अहमदनगर येथून आणलेला गांजा वाकड पोलिसांनी ताथवडे येथे पकडला. गांजा आणणारे दोघे आणि ज्यांच्या घरात गांजा सापडला ते दोघे अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सायंकाळी ताथवडे गावात करण्यात आली.
सुनील सुधाकर भापकर (वय 25, रा. काळेवस्ती, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रवीण उर्फ पवन दिलीप गाडे (वय 21, रा. माळेगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), आकाश महादेव खाडप (वय 20, रा. पवारवस्ती, ताथवडे), रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय 22, रा. ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक प्रशांत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि प्रवीण यांनी अहमदनगर येथून आरोपी आकाश आणि रविराज यांना गांजा विक्रीसाठी आणून दिला. तो आकाश आणि रविराज यांच्या घरात ठेवला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आकाश आणि रविराज यांच्याकडून पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
पोलिसांनी आरोपींकडून साडेनऊ हजार रूपये रोख रक्कम आणि 80 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोनही जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक करत एकूण सात लाख 24 हजार 875 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.