सांगवी आणि पिंपरीत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत पाच जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/ganja-arrest.jpg)
गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी आणि पिंपरी परिसरात दोन कारवाया केल्या. त्यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाट येथे पवना नदीच्या किनारी आडोशाला तिघेजण गांजा ओढत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी कारवाई करत सुनील शिवाजी शितोळे (वय 34, रा. जुनी सांगवी), असिफ बहादुरशहा सय्यद (वय 44, रा. काटेपुरम चौक, सांगवी), महेश मलेश रावलल्लू (वय 42, रा. जुनी सांगवी) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम गांजा आणि 35 रुपयांचे गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले. सहाय्यक पोलीस फौजदार जिलाणी मोमीन यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाटनगर येथे दोघेजण गांजा ओढत असल्याची माहिती मिळाल्याने अंमली पदार्थ विरोधात पथकाने तिथे कारवाई करून यश सर्जेराव खवळे (वय 19, रा. भाटनगर झोपडपट्टी, पिंपरी), मिनाज अजीज आलम (वय 26, रा. काळेवाडी स्मशानभूमीजवळ) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 10 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा एकूण 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार राजेंद्र देवराम बांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.